मुंबई शहरातील फेरीवाल्यांचा प्रश्न न्यायालयात नव्हे तर राज्य शासनानेच सोडवावा

By मनोहर कुंभेजकर | Published: July 26, 2024 06:58 PM2024-07-26T18:58:33+5:302024-07-26T18:58:41+5:30

माजी खा. गोपाळ शेट्टी यांची मुख्यमंत्र्यांना सूचना

The problem of hawkers in Mumbai city should be solved by the state government and not by the court | मुंबई शहरातील फेरीवाल्यांचा प्रश्न न्यायालयात नव्हे तर राज्य शासनानेच सोडवावा

मुंबई शहरातील फेरीवाल्यांचा प्रश्न न्यायालयात नव्हे तर राज्य शासनानेच सोडवावा

मुंबई- मुंबई शहराची लोकवस्ती जवळपास दीड कोटींपेक्षाही अधिक होत चालली असून इतक्या लोकांसाठी लागणारी फळ फळावळ, फुले, भाजीपाला इत्यादी विक्रीसाठी मुंबई महानगरपालिकेमार्फत आवश्यक इतक्या मंडई (मार्केट्स) निर्माण झालेल्या नाहीत.कांदिवली, बोरिवली तसेच मुंबई शहरात अनेक ठिकाणी सुरुवातीच्या काळात बांधण्यात आलेल्या मंडई (मार्केट्स) सुद्धा मोडकळीस आल्या असून त्यांच्या पुनर्बाधणीला सुद्धा सुरुवात झालेली नसून प्रकरणे कोर्ट, कचेरी, ठेकेदाराच्या चौकटीत अडकलेल्या दिसून येत आहेत.
 
मुंबईत फेरीवाले ही एक समस्या नसून एक व्यवस्था आहे त्याचे नीटनेटकेपणे व्यवस्थापन करणे हे राज्य सरकार, मुंबई महानगरपालिका आणि सर्व राजकीय पक्षातील लोकांचे काम आहे. सर्वोच्च न्यायालयात सन १९८५ पासून फेरीवाला झोन (क्षेत्र) बनविण्यासाठीचा प्रस्ताव अद्याप मार्गी लागत नाही तर दुसरीकडे पीआयएलकर्ते न्यायालयात खटला दाखल करून फेरीवाल्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे ही आभार मानले पाहिजेत, परंतू न्यायालयामार्फत हे प्रश्न सुटणार नसून शासन प्रशासनाने फेरीवाल्यांची व्यवस्था करून मार्ग काढला पाहिजे. अशी सूचना उत्तर मुंबईचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पत्रात केली आहे.

एकीकडे मुंबई शहराची लोक वस्ती वाढल्याने इमारत बांधकामातील दुप्पट / तिप्पट वाढलेला एफ एस आय. तसेच मुंबई विकास नियोजन आराखडा २०३४ नुसार आरक्षित मार्केटसही बांधण्यात आलेली नसल्यामुळे एक फार मोठी समस्या सध्या व येणाऱ्या काळात मुंबई शहरातील लोकांसाठी भेडसावणार आहे याकडे त्यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.

हल्ली गेल्या काही महिन्यात न्यायालय, उच्च न्यायालय मार्फत फेरीवाल्यांच्या समस्यांबाबत. कडक ताशेरे ओढले जात असून एकूणच फेरीवाल्यांच्या बाबतीत मुंबई शहरातल्या कोणत्याही राजकीय पक्षा मार्फत गांभीर्याने विचार केला जात नाही ही सुद्धा तितकीच वास्तविकता आहे आणि त्यामुळे फेरीवाल्यांच्या समस्येवर मार्ग शोधण्यासाठी सर्व राजकीय पक्षातल्या नेत्यांबरोबर संयुक्त बैठकीद्वारे योग्य मार्ग शोधला पाहिजे असे मत त्यांनी मांडले आहे.  फेरीवाले मुंबई शहरातील लोकांना नुसती सुविधाच पुरवीत नसून मुंबई शहरातील लोकांच्या दैनंदिन जीवनाचे अविभाज्य भाग बनले आहेत असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

न्यायालयाने तसेच प्रशासनाने रेल्वे स्टेशनच्या १५० मीटर तसेच रस्त्याच्या जंक्शनवर फेरीवाल्याने अतिक्रमण केल्यास वाहतुकीला अडचण होत असल्याने वारंवार कारवाई केली आहे व अधून मधून पुन्हा पुन्हा कारवाई करीत असतात परंतु फेरीवाले काही ऐकण्याच्या मनःस्थितीत नसतात. या मागची भावना, गरज लक्षात घेणे आवश्यक  असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

मुंबई शहरातील लोकांना लागणारी फळ फळावळ, फुले, भाजीपाला विकण्यासाठी व्यवस्था करणे हे मुंबई महापालिकेची जबाबदारी असून मुंबई महापालिकेस काही ना काही कारणांमुळे अजूनही पार पाडता आलेली नाही. परंतु देशाचे पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी व्यक्त मुंबई शहराला जागतिक दर्जाचे शहर बनविण्याचा विचार करीत असताना मुंबई शहरातील दोन महत्त्वाचे प्रश्न म्हणजे झोपडपट्टी मुक्त मुंबई आणि फेरीवाले मुक्त मुंबई करण्यासाठी तातडीने पावले उचलून उपाय योजना करणे अत्यंत गरजेचे आहे. आपण तत्परतेने सर्व पक्षातील नेत्यांबरोबर चर्चा विनिमय करून मार्ग काढाल अशी विनंती शेवटी गोपाळ शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे.

Web Title: The problem of hawkers in Mumbai city should be solved by the state government and not by the court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.