Join us

Eknath Shinde: "राज्याची प्रगती थांबता कामा नये, ती फक्त तुम्हीच करू शकता"; शिंदेंवर स्तुतीसुमने

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 5:46 PM

सांगोल्यासारख्या ग्रामीण भागातून आमदार म्हणून निवडून आलेले शहाजीबापू पाटील यांची ओळख आज झाडी, डोंगर आणि हॉटेल या अस्सल गावरान शैलीमुळे संपूर्ण महाराष्ट्राला झाली.

मुंबई - आपल्या माणदेशी स्टाईलने जगभरातील मराठी माणसांमध्ये प्रसिद्ध झालेले सांगोला मतदारसंघाचे शिवसेना आमदार शहाजी पाटील यांनी आज रेडीसन ब्लू हॉटेलमधील उपस्थित आमदारांशी संवाद साधला. यावेळी, भाषण करताना आपल्या मतदारसंघातील समस्या आणि शरद पवारांचं राजकारण यावर त्यांनी भाष्य केलं. तसेच, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाचं कौतुकही केलं. महाराष्ट्राची प्रगती करण्यासाठी तुमच्यासारख्या नेतृत्त्वाची गरज असल्याचंही ते एकनाथ शिंदेंकडे पाहून म्हणाले. शहाजी पाटील यांचा हा व्हिडिओ आता समोर आला आहे.

सांगोल्यासारख्या ग्रामीण भागातून आमदार म्हणून निवडून आलेले शहाजीबापू पाटील यांची ओळख आज झाडी, डोंगर आणि हॉटेल या अस्सल गावरान शैलीमुळे संपूर्ण महाराष्ट्राला झाली. मात्र, या माणसाने आयुष्यभर अतोनात संघर्ष केला आहे. त्यातूनच त्यांना आलेले काही अनुभव त्यांनी आपल्या खास शैलीमध्ये उपस्थित आमदारासमोर कथन केले. यावेळी, त्यांनी शरद पवार यांच्याविरोधात तुफान फटकेबाजी केली. काहीही निर्णय घ्या, फक्त शरद पवारांबरोबर नको, नायतर आपण मेलूच असं म्हणताच रॅडीसन ब्लू हॉटेलच्या सभागृहात एकनाथ शिंदेंसह मोठा हशा पिकला.

सांगोला तालुक्यातील 2 टीएमसी पाण्याचा प्रश्नही त्यांनी तिथं बोलून दाखवला. तसेच, सांगोला उपसा सिंचन योजनेला हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्या म्हणून मी स्वत: मुख्यमंत्र्यांच्या हातात पत्र दिलं, पावणेतीन वर्षे झालं त्याही काय होईना, असे पाटील म्हणाले. तसेच, शंकरराव चव्हाण यांनी राज्याचं नेतृत्व हाताळलंय, वसंत दादा पाटील, वसंतराव नाईक यांसारख्या मोठ-मोठ्या लोकांनी राज्याचं नेतृत्व हाताळलंय. म्हणून हे राज्य प्रगतीपथावर गेलंय. प्रगती राज्याची थांबता कामा नये, ती प्रगती फक्त तुम्ही आणि तुम्ही करू शकता हा आम्हाला ठाम विश्वास आहे, कारण आम्ही तुमच्या खात्याचा कारभार जवळून बघितलाय, असे शहाजी पाटील यांनी म्हटले. तसेच, मोबाईलवरुन बोलतानाचा काय झाडी, डोंगार, हाटील याचा किस्सा कसा घडला हेही सांगितलं.  

वसंत दादा पाटलांच्या राजीनाम्याचा किस्साही सांगितला

वसंत दादा माझे वडिल आहेत, त्यांच्याच आशीर्वादाने मी मोठा झालेलो आहे आणि मी वसंत दादांना कधीच दगा देणार नाही - शरद पवार आणि दीड वाजता तिथंच बातमी आली की, शरद पवारांनी बंड केलंय. 40 आमदार घेऊन काँग्रेसचं पळून गेलं. लगेच वसंत दादांना राजीनामा दिला, असा किस्सा शहाजी पाटील यांनी हॉटेलमध्ये आमदारांसमोर भाषण करताना सांगितला. त्यावेळी, सर्वांनाच हसू आले. त्यानंतरही, त्यांनी शरद पवारांनी कशारितीने अनेकांचं राजकारण संपवलं हेही त्यांनी सांगितलं. त्यावेळीही उपस्थित आमदारांना जोरजोरात हसत दाद दिली. तसेच, एकनाथ शिंदेंच्या कामाची स्टाईल आम्ही पाहिलीय. त्यामुळे, आम्हाला विश्वा आहे की, त्यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्र प्रगत होईल, असे म्हणत एकनाथ शिंदेंच्या कामाचं जोरदार कौतुक केलं. 

टॅग्स :एकनाथ शिंदेशरद पवारसांगोलासोलापूर