समुद्राचे पाणी गोड करण्यास कोणीच पुढे येईना; प्रकल्पाला पाचव्यांदा देण्यात आली मुदतवाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 10:05 AM2024-03-12T10:05:13+5:302024-03-12T10:11:05+5:30
पुढच्या महिन्यापर्यंत अर्ज करता येणार.
मुंबई : मनोरी येथे समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याचा नि:क्षारीकरण प्रकल्पाला पाचव्यांदा मुदतवाढ मिळाली आहे. या प्रकल्पासाठी पालिकेने पुन्हा निविदाप्रक्रिया सुरू केली असून, पुढच्या एका महिन्यापर्यंत अर्ज करता येणार आहे.
मुंबईला दररोज सात धरणांतून ३८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र, एखाद्या वर्षी पाऊस कमी पडल्यास मुंबईकरांना १० ते १५ टक्के पाणीकपातीला सामोरे जावे लागते. त्यातच येत्या काळात मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येसाठी पाण्याची मागणीही वाढणार आहे. ती पूर्ण करण्यासाठी पालिकेने मनोरी येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अखत्यारित उपलब्ध असलेल्या १२ हेक्टर जागेवर प्रकल्प उभारण्याचे ठरवले आहे.
१) या प्रकल्पासाठी पालिकेकडून डिसेंबर ते जानेवारीदरम्यान निविदाप्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, त्याला आवश्यक प्रतिसाद मिळाला नाही.
२) अनेक इच्छुकांनी अर्जासाठी कमी कालावधी मिळाल्याची माहिती दिली. त्यामुळे पालिकेने पुन्हा एका महिन्याचा वेळ देऊन ही प्रक्रिया सुरू केली.
३) पालिकेने या निविदेला दि. २९ जानेवारी, १७ फेब्रुवारी, ४ मार्च अशी मुदतवाढ दिली होती.
४) आता पुन्हा पाचव्यांदा आणखी एका महिन्यासाठी ही निविदाप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही आंतरराष्ट्रीय दर्जाची निविदाप्रक्रिया असल्याने अनेकदा अशा प्रकल्पांसाठी वेळ लागत असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
हा प्रकल्पच अव्यवहार्य - मुंबईसारख्या मोठ्या लोकसंख्येच्या आंतरराष्ट्रीय शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पालिका प्रशासनाने समुद्राच्या पाण्यापासून गोडे पाणी मिळविण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. मात्र, हा प्रकल्प अव्यवहार्य असून, तो ताबडतोब रद्द करावा. गारगाई पिंजाळ धरण प्रकल्पाला गती द्यावी, असा परखड निष्कर्ष मुंबई विकास समितीने आपल्या अहवालात काढला आहे.
समुद्राचे पाणी गोड करण्याचा हा प्रकल्प येत्या चार वर्षांत पूर्ण करण्याचे पालिकेचे उद्दिष्ट असून, प्रकल्प बांधणीचा खर्च अंदाजे तीन हजार ५२० कोटी रुपये आहे. या प्रकल्पाच्या संयंत्राचे बांधकाम, प्रचालन आणि परीरक्षण पुढील २० वर्षांसाठी आहे.