लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ग्राहकांना नुकसानभरपाईपोटी जारी केलेले वॉरंट्स वसूल व्हावे यासाठी महारेरा जिल्हाधिकारी कार्यालयांच्या संपर्कात असून, अनेक ठिकाणी संबंधित बिल्डर्सच्या मालमत्ता जप्त करून लिलाव केला जात आहे. राज्यात आणखी काही ठिकाणी लवकरच असे लिलाव होणार असून, मालमत्ता जप्त होऊ नये म्हणून बिल्डर्स नुकसानभरपाईच्या रकमा भरत आहेत किंवा ग्राहकांच्या भरपाईचा प्रश्न निकाली काढत असतानाच आतापर्यंत या पद्धतीने २० वॉरंट्सपोटी मुंबई शहर आणि उपनगर, रायगड, ठाणे जिल्ह्यातील ११ बिल्डर्सने ८ कोटी ५७ लाख २६ हजार ८४६ रुपये जमा केले आहेत.
महारेराने ६२४.४६ कोटींच्या वसुलीसाठी १ हजार ७ वारंट्स जारी केले. यापैकी १२४ वॉरंट्सच्या माध्यमातून ११३.१७ कोटी वसूल झाले. ज्यांनी रकमा जमा केल्या किंवा ग्राहकांशी तडजोडी केल्या. त्यात मुंबई उपनगरातील विधी रिअल्टर्स, स्कायस्टार बिडकाॅन, लोहितका प्रॉपर्टीज, व्हिजन डेव्हलपर्स आणि विजयकमल प्रॉपर्टीज या ५ बिल्डर्सचा समावेश आहे. त्यांनी अनुक्रमे ४ कोटी १ लाख ९७ हजार, ५७ लाख ८४ हजार, १७ लाख ४० हजार, ३७ लाख, २५ लाख ६६ हजार १३७ अशी एकूण ५ कोटी ३९ लाख ८७ हजार १३७ रकमेचे दावे निकाली काढत रक्कम जमा केली.
व्हिजन डेव्हलपर्सप्रकरणी उच्च न्यायालयात समेट झाला आहे. विधी रिअल्टर्स आणि विजयकमल प्रॉपर्टीज यांनी ग्राहकांशी तडजोड करून तडजोडीच्या प्रतींची उप निबंधकांच्या कार्यालयात नोंदणी करून घेतले आहे.
अलिबाग भागातील विनय अग्रवाल या बिल्डरकडे १३ वॉरंट्सपोटी नुकसानभरपाईची १ कोटीवर देणी आहेत. त्यापैकी त्यांनी न्यायाधिकरणाकडे ७८ लाख ८५ हजार ४३१ रक्कम जमा केली आहे. यातून १० वॉरंट्सची पूर्तता होणार आहे.
मातोश्री प्रॉपर्टीज, श्री सद्गुरू डीलक्स आणि फलक डेव्हलपर्सनीही ३ वॉरंट्सचे अनुक्रमे २२ लाख ५० हजार, १५ लाख ७५ हजार आणि ९ लाख ७० हजार ५५० असे एकूण ४७ लाख ९५ हजार ५५० जमा करण्यात आले.
रवी डेव्हलपर्स आणि नताशा डेव्हलपर्स या दोन बिल्डरने तडजोड करून एकेक वॉरंट्सपोटी अनुक्रमे १ कोटी १९ लाख ५८ हजार ७२८ आणि ७१ लाख जमा केले.