अल्पवयीन वाहन चालकांचे मुंबईमध्ये प्रमाण कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2023 02:11 PM2023-04-04T14:11:27+5:302023-04-04T14:11:41+5:30

दंडाच्या रकमेत वाढ झाल्याने लागला लगाम

The proportion of underage drivers in Mumbai is low | अल्पवयीन वाहन चालकांचे मुंबईमध्ये प्रमाण कमी

अल्पवयीन वाहन चालकांचे मुंबईमध्ये प्रमाण कमी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: अल्पवयीन मुले वाहन चालविताना दिसून येतात. घराजवळ ‘चक्कर’ मारण्यापासून खरेदीसाठी बाजारपेठेत जाण्यापर्यंत विविध ठिकाणी अल्पवयीन मुले दुचाकी घेऊन जातात. मात्र, १६ वर्षांखालील मुलगा किंवा मुलगी वाहन चालविताना वाहतूक पोलिसाला आढळल्यास, पाच हजार रुपये दंड तर पालकांना १० हजारांचा दंड आहे. दंडाच्या रकमेत वाढ केल्यानंतर अल्पवयीन मुलांचे प्रमाण कमी झाल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले.

अल्पवयीन मुलांकडून वाहने चालविण्याचे प्रकार घडत असून, त्यामुळे अपघातही होतात. हे प्रमाण कमी करण्यासाठी १८ वर्षाखालील मुलांना विनापरवाना वाहन चालविण्यास पालकांनी परवानगी देऊ नये. अन्यथा अल्पवयीन मुलांच्या पालकांना शिक्षा व दंडात्मक कारवाई करण्यात येते. मोटार वाहन कायद्यांतर्गत १६ वर्षांखालील मुलांनी वाहन चालविण्याचा गुन्हा केला तर गुन्ह्यांमध्ये दोषी आढळणाऱ्या मुलांच्या पालकांना तीन वर्षे कारावास व २५ हजार रुपये दंडाची तरतूद केली आहे. त्याचप्रमाणे वाहन चालविण्याचा परवाना नसताना वाहन चालविल्यास चालकास पाच हजार व वाहनमालकास पाच हजार असा एकूण १० हजार रुपये दंड व शिक्षेची तरतूद मोटर वाहन कायद्यात करण्यात आली आहे.

महाविद्यालयाजवळ अल्पवयीन वाहनचालक मुला-मुलींचा संख्या जास्त असल्याचे दिसून येते. अनेक जण आपल्या वडिलांची दुचाकी घेऊन येतात. क्लाससाठी जाण्यासाठीही ते वाहनांचा वापर करतात. वाहतूक पोलिसांना कळू नये, म्हणून अनेकजण हेल्मेटचा वापर करतात, तर महाविद्यालयाच्या आवारात हे अल्पवयीन विद्यार्थी ट्रीपल सीट जातानाही दिसून येतात.

....तर पालकांना होईल तुरुंगवास

आपल्या अल्पवयीन मुलांना गाडी देणाऱ्या पालकांवरही वाहतूक पोलिस दंडात्मक कारवाई करू शकतात शिवाय मुलाकडून अपघात झाल्यास, तसेच नियमांचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाईसोबत पालकांना तुरुंगाची हवा खावी लागू शकते. वाहन कायद्यात तशी तरतूद आहे. त्यामुळे पालकांनीही आपल्या अल्पवयीन मुलाला वाहन देऊ नये, असे आवाहन सामाजिक संस्थांकडून करण्यात येत आहे.

मुंबईत वाहतुकीचे पर्याय उपलब्ध

ग्रामीण भागात वाहतुकीचे साधने कमी असल्याने मुले सर्रास दुचाकीचा वापर करतात तर मुंबईत मेट्रो,  लोकल, बस यासारखे पर्याय उपलब्ध असल्याने कमी प्रमाणात दुचाकींचा वापर करतात. जर कोणी नियम उल्लंघन करताना आढळला तर त्यावर कारवाई केली जाते, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले.

Web Title: The proportion of underage drivers in Mumbai is low

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.