Join us

रेसकोर्सवर ‘थीम पार्क’चाच प्रस्ताव; राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 9:49 AM

महालक्ष्मी रेसकोर्सच्या १२० एकर जमिनीवर ‘थीम पार्क’उभारण्याबाबत अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.

मुंबई : महालक्ष्मी रेसकोर्सच्या १२०  एकर जमिनीवर ‘थीम पार्क’उभारण्याबाबत अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. केवळ प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे, अशी माहिती राज्य सरकारने मुंबईउच्च न्यायालयाला बुधवारी दिली.

रेस कोर्सवर ‘थीम पार्क’ उभारण्याच्या विरोधात उच्च न्यायालयात तीन याचिका दाखल करण्यात आल्या. या याचिकांवरील सुनावणी न्या. गौतम पटेल व न्या. कमल खटा यांच्या खंडपीठापुढे सुरू होती. राज्य सरकारतर्फे महाअधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी खंडपीठाला सांगितले की, अंतिम निर्णय घेण्यापूर्वीच याचिका दाखल करण्यात आली आहे. प्रस्ताव सादर करण्यात आला आहे आणि तो विचाराधीन  आहे. मुख्यमंत्री एका बैठकीत अंतिम निर्णय घेतात, असे नाही. जमिनीवर ‘थीम पार्क’ उभारण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. ही केवळ एक कल्पना आहे. भूखंडाचा वापर कसा करायचा, यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. सरकारला विचार करण्यापासूनही अडवणार का, असा सवाल सराफ यांनी केला. 

‘योग्य खंडपीठापुढे याचिका वर्ग करा’

रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लि.ने निर्णय घेतल्यावर त्यांना संबंधित विभागांकडे प्रस्ताव पाठवावा लागेल, असे सराफ यांनी म्हटले. तर मुंबई महापालिकेतर्फे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी  यांनी न्यायालयाला सांगितले की, ही जनहित याचिका आहे. त्यामुळे योग्य खंडपीठापुढे ही याचिका वर्ग करण्यात यावी. त्यानंतर ही याचिका मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे याचिका दाखल करण्यात आली.  त्यावर न्यायालयाने यासंबंधी आदेश देऊ, असे म्हटले. 

पर्यावरणाला ‘हानी’ पोहोचविणारा निर्णय?

महालक्ष्मी  रेसकोर्सच्या १२० एकर जागेवर ‘थीम पार्क’ उभारण्याच्या राज्य सरकार व मुंबई महापालिकेच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका काही पर्यावरणवाद्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. रेसकोर्सवर ‘थीम पार्क’ उभारण्याचा राज्य सरकारचा निर्णय बेकायदेशीर, मनमानी आणि ‘पर्यावरणाला हानी’ पोहचविणारा आहे, असे याचिकाकर्ते व मुंबईचे रहिवासी सत्येन कापडिया यांनी याचिकेत म्हटले आहे.

टॅग्स :मुंबईउच्च न्यायालयनगर पालिका