मुंबई - भारतातील पेरू प्रजासत्ताक दूतावास आणि कमलनयन बजाज आर्ट गॅलरी यांच्या संयुक्त विद्यमाने 'द पुकारा बुल : पेरूव्हियन हायलँड्सचा राजदूत' या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनातील पेरू येथील स्थानिक पारंपरिक कलाकारांची कलाकूसर कलाप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहे.
१७ ऑक्टोबर रोजी सुरू झालेले हे प्रदर्शन २७ ऑक्टोबरपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. पेरू आणि भारतातील राजनैतिक संबंधांच्या ६० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. पेरू हा देखील भारताप्रमाणे समृद्ध सांस्कृतिक वारसा असलेला देश आहे. पुकारा बूल हे या देशातील कलेचे प्रतिनिधित्व करणारे रूपक आहे. पेरू हा देखील कृषी प्रधान देश असल्याने बैल हे कृषीप्रधान देशाचे सांस्कृतिक प्रतिनिधित्व करतात.
एक प्रकारे बैलांना पेरूमध्ये शुभ संदेश देणारे सुचिन्ह देखील मानले जाते. त्यामुळे येथील घरांवर बैलाची जोडी हे रक्षक किंवा शुभसूचक सूचना करणारे प्रतीक म्हणून मानले जातात. पेरूमधील घरांच्या छतावर या बैलाच्या जोडीची प्रतिष्ठापना केली जाते. त्यांना विविध कलात्मक पद्धतीने सजवले जाते. पेरू येथील स्थानिक पारंपरिक कलाकार या बैलांची कलाकूसर अगदी वेगवेगळ्या पद्धतीने करत असतात. त्यामुळे हे केवळ संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारे चिन्हच नाही तर एक कलाविष्कार बनतो. आपल्याकडे जसे पोळ्याला आपल्याकडे ज्याप्रमाणे पोळ्याला बैलांची जोडी तयार केली जाते आणि त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने सजवले जाते. तशाच प्रकारचे हे एक प्रतीक आहे या पुकारा बुल सांस्कृतिक तसेच ऐतिहासिक महत्त्व देखील आहे. वेगवेगळ्या पद्धतीने सजवलेले हे पुकारा बूल वेगवेगळे, वेगवेगळ्या मानसिक स्थितीचे प्रतिकही असतात. या बैलाच्या जोडीवरून एखाद्या कुटुंबाच्या सद्यःस्थितीची माहितीही कळते. घराच्या छतावर कुठल्या प्रकारची बैलजोडी आहे त्यावरून ते लग्न घर आहे हे ही कळू शकते.
मातीपासून बनलेली ही बैलजोडी चित्रकार अतिशय आकर्षक पद्धतीने सजवतात. त्यांच्यावर नाजूक आणि ठाशीव अशा दोन्ही प्रकारे कलाकुसर करण्यात येते. ठसठशीत आणि तेजस्वी रंग या बैलांना अधिक आकर्षक बनवतात. त्यामुळे केवळ सांस्कृतिक प्रतीक न राहता हे पुकारा बैल हे कलेचा अजोड नमुना म्हणून जगभर ओळखले जातात. त्यामुळेच या आगळ्यावेगळ्या संस्कृतीशी भारतीयांचा परिचय करून देण्यासाठी पेरूच्या दुतावासाने पुकारा बुल या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. पेरूचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक तसेच कला वारसा जाणून घेण्यासाठी चुकू नये असेच हे प्रदर्शन आहे.