Join us  

कॅन्सरसाठीचा रेडिएशन विभाग बंद! सेव्हन हिल्समधील रुग्णांची गैरसोय, उपायुक्तांकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 9:38 AM

सेव्हन हिल्स रुग्णालयात कर्करोग रुग्णांना रेडिएशन उपचार देण्यासाठी स्वतंत्र विभाग सुरू होता

मुंबई :

सेव्हन हिल्स रुग्णालयात कर्करोग रुग्णांना रेडिएशन उपचार देण्यासाठी स्वतंत्र विभाग सुरू होता आणि या विभागामार्फत दरदिवशी सुमारे ८० ते १०० रुग्णांना उपचार देण्यात येत होते. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून रेडिएशनसाठीची लिनिअर ॲक्सिलरेटर मशीन बंद असल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. याबाबत सुशोभीकरणासाठी सरकार कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करत असताना ही मशीन दुरुस्त करण्यासाठी आवश्यक १२ कोटी रुपये देण्यास चालढकल का होते, असा सवाल यानिमित्त माजी आमदार आणि  नगरसेवक करत आहेत. 

कोविडच्या काळात दोन ते तीन वर्षे हा विभाग बंद राहिल्याने रेडिएशन देणारे लिनिअर ॲक्सिलरेटर मशीन बिघडले. हे मशीन दुरुस्त करण्यासाठी १२ कोटी रुपयांची गरज असून आवश्यक डॉक्टर व तांत्रिक कर्मचारी यांच्यावर होणारा खर्च यासाठी ३ कोटी रुपये असे मिळून एकूण १५ कोटी रुपये खर्चाची आवश्यकता आहे; परंतु ही रक्कम मुंबई महापालिका प्रशासनाकडून मिळत नसल्याचा आरोप करण्यात येत आहेत. येथील या समस्येमुळे आमदार रवींद्र वायकर यांनी सेवन हिल्स रुग्णालयातर्फे देण्यात येणाऱ्या विविध सुविधा व सेवांची माहिती घेण्यासाठी मंगळवारी रुग्णालय प्रशासनाबरोबर बैठकीचे आयोजन केले. यावेळी पालिकेतर्फे विशेष कार्यकारी अधिकारी महारुद्र कुंभारे, सेवन हिल्स प्रशासनाचे अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते. या बैठकीदरम्यान कॅन्सर पेशंटसाठी वरदान ठरणारे लिनिअर ॲक्सिलरेटर हे मशीन तत्काळ दुरुस्त करण्यासाठी आवश्यक १२ कोटी रुपये देण्यात यावेत, अशी मागणी वायकर यांनी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त संजय कुऱ्हाडे यांच्याकडे केली आहे. 

कॅन्सरसाठी विशेष विभाग सुरू करण्याची मागणीसद्य:स्थितीत दर दिवशी सुमारे ८० ते १०० रुग्ण रेडिएशनसाठी रुग्णालयात येतात; परंतु ही सुविधा बंद असल्याने उपनगरातील अनेक कॅन्सर रुग्णांना सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे ही सुविधा पुन्हा सुरू करून रुग्णांना दिलासा देण्यासाठी मशीन दुरुस्तीसाठी आवश्यक १२ व तांत्रिक कर्मचारी यांच्यासाठी आवश्यक ३ कोटी रुपये देण्यात यावेत. यासोबत टाटा रुग्णालयावर भार कमी करण्याबरोबरच या रुग्णालयात १०० खाटांचे कॅन्सर रुग्णालय सुरू करण्यात यावे, असेही वायकर यांनी यात बैठकीत स्पष्ट केले.