हार्बर रेल्वे मार्गाचाही प्रशासनाने थोडा विचार करावा ! प्रवाशांची अपेक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 09:59 AM2024-05-08T09:59:43+5:302024-05-08T10:05:24+5:30
उपाययोजनांवर अधिक भर हवा.
मुंबई : मध्य आणि हार्बर मार्गावर लोकलच्या दररोज होत असलेल्या खोळंब्यामुळे प्रवासी कमालीचे हैराण झाले आहेत. रेल्वेचे ३६५ दिवस हेच रडगाणे असल्याचे म्हणत रेल्वे प्रशासनाने उपाययोजना आखण्यावर लक्ष केंद्रित करावे, अशी सूचना त्यांनी केली आहे.
बहुतांशी प्रवाशांनी लोकल फेऱ्या वाढविण्यासह एसी लोकलचे तिकीट कमी करावे, यावर भर दिला आहे. एसी लोकलचे तिकीट कमी करणे जमत नसेल तर त्या बंदच करा, कारण सामान्यांना त्याचे भाडे परवडत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.प्रवासी संघटना व रेल्वे प्रशासन यांच्यात नियमित बैठका आवश्यक आहे. लोकल सेवा अजून चांगली होण्यासाठी प्रत्येक स्तरावर काम केले पाहिजे. लोकल फेऱ्या वाढविल्या पाहिजेत. गर्दी कमी होईल, यासाठी सुरक्षा यंत्रणा वाढविली पाहिजे.- राकेश जाधव
सरकारने व्यवसायांना प्रोत्साहन देऊन ठाणे, वाशी आणि बोरिवलीच्या पलीकडे कार्यालये स्थलांतरित करण्यासाठी पावले उचलावीत. कारण प्रवास करणारे लोक बहुतांशी याच भागातील असतात. आज बहुतेक कार्यालये दक्षिण मुंबई, वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी), अंधेरी येथे आहेत.- विनायक मोरे
मध्य व हार्बर मार्गावर लोकलच्या फेऱ्या पश्चिम रेल्वेच्या तुलनेने कमी आहेत. गाड्या विलंबाने धावण्याचे प्रकार मध्य व हार्बर मार्गावर जास्त आहेत. एसी लोकलच्या फेऱ्या वाढवून तिकीट कमी केल्यास जास्त प्रवासी याचा फायदा घेऊ शकतात.- सागर अवघडे
हार्बर मार्गावर जलद लोकल गाड्यांची आवश्यकता आहे. अतिरिक्त मार्गिका आवश्यक आहे. जेणेकरून दुरुस्तीच्या वेळी, अतिरिक्त मार्गावरून लोकल सहजपणे जाऊ शकते. यामुळे मेगाब्लॉकची समस्याही कमी होईल आणि गाड्यांमधील प्रवाशांची गर्दीही कमी होईल. एसीचे दर कमी करावेत- शेख फय्याज आलम
रेल्वे तसेच महिला प्रवाशांची सुरक्षा यावर रेल्वे बोर्डाने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस मुंबईची लोकसंख्या वाढत असल्यामुळे लोकलमध्ये गर्दीत वाढ होत आहे. अपघाताच्या घटनांमुळे लोकांचे बळी जात असून त्यासाठी फेऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करावी. १५ डब्यांच्या लोकल चालवण्यासाठी रेल्वे नियोजन करावे. जेणेकरून लोकलचा प्रवास गर्दीमुक्त होईल.- अजय वाघ
दिवसेंदिवस मुंबईची वाढती लोकसंख्या पाहता लोकल रेल्वेवरील ताण वाढला आहे. त्याचा परिणाम प्रवासी व रेल्वे दोघांवरही दिसून येतो. सरकार व रेल्वे यांनी त्वरित एकत्र येऊन उपाययोजना करावी. जेणेकरून प्रवाशांचा त्रास व रेल्वेचा ताण कमी होईल.- उमेश थोरात