मुंबई : दुपारी अडीचची वेळ... छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटणाऱ्या अंबरनाथ लोकलच्या सेकंड क्लास डब्याभोवती रेल्वे अधिकारी, कर्मचारी, कॅमेरांचा गराडा पडलेला... खुद्द रेल्वेमंत्रीअश्विनी वैष्णव या गाडीतून प्रवास करणार होते...
मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विक्रोळी असा लोकलने प्रवास करत प्रवाशांशी संवाद साधला. यावेळी अनेक प्रवाशांनी त्यांच्या रोजच्या प्रवासाचे अनुभव मंत्रिमहोदयांना कथन केले तसेच तक्रारींचा पाढाही वाचला. स्वत: मंत्रीच प्रवास करत असल्याचे निमित्त साधत काही उत्साही प्रवाशांनी त्यांच्याबरोबर सेल्फीही काढला. वैष्णव यांनीही लोकल प्रवाशांचे रोजचे अनुभव ऐकून घेत रेल्वेच्या कारभारात सुधारणा करण्याचे आश्वासन दिले. विक्रोळीला उतरून मंत्रिमहोदयांनी गणपतीचे दर्शन घेतले.
महामुंबईचा प्रवास वेगवान...
यानंतर पत्रकारांशी बोलताना वैष्णव यांनी लोकल सेवा सुधारण्यासाठी महामुंबईतील १२ प्रकल्पांच्या माध्यमातून १६ हजार कोटींच्या ३०३ किमीच्या नव्या मार्गिका उभारण्याचे काम वेगाने सुरू असल्याचे सांगितले. हे काम पूर्ण झाल्यावर रेल्वेच्या क्षमतेसह सेवांमध्ये वाढ करण्यासाठी मदत होणार असल्याचा विश्वास मंत्रिमहोदयांनी व्यक्त केला. देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि उपनगरातील प्रवाशांची जीवनवाहिनी असलेल्या लोकलचा प्रवास सुसह्य करण्यासाठी नव्या मार्गिका उभारण्याच्या कामाला गती देण्यात येत आहे. देशाच्या आर्थिक राजधानीत जीवनवाहिनी म्हणून धावत असलेल्या मुंबई लोकलच्या विस्तारावर रेल्वेमंत्र्यांनी भाष्य केले.