Join us

पाऊस थांबला... अन् मुंबईच्या आकाशात पसरली धुरक्याची चादर, दक्षिण मुंबईत धुळीच्या कणांचे साम्राज्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2024 7:57 AM

मंगळवारी दुपारी दक्षिण मुंबईत धुळीच्या कणांचे साम्राज्य होते. तर अशीच परिस्थिती मुलुंडमध्ये होती, असे अभ्यासकांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मान्सून परतत असतानाच मुंबई शहर आणि उपनगरातील प्रदूषणाने डोके वर काढले आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच मुलुंड आणि आसपासच्या परिसरासह दक्षिण मुंबईतील कुलाबा आणि लगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर धुळीचे कण दिसल्याचे पर्यावरण अभ्यासकांनी सांगितले. 

मंगळवारी दुपारी दक्षिण मुंबईत धुळीच्या कणांचे साम्राज्य होते. तर अशीच परिस्थिती मुलुंडमध्ये होती, असे अभ्यासकांनी सांगितले. बुधवारी सकाळी मुंबईत काहीअंशी ढगाळ वातावरण होते, तर दुपारी सर्वसाधारण हीच परिस्थिती असल्याचे अभ्यासकांनी नमूद केले.पावसाळा संपल्यानंतर मुंबईतल्या प्रदूषणामध्ये वाढ होण्यास सुरुवात होते. इमारती आणि रस्त्यांच्या कामांमुळे होणारी धूळ, वाहनातून निघणारा धूर आणि धुके यांच्या मिश्रणाने धुरके तयार होते. या धुरक्याचा त्रास मुंबईकरांना होतो. या संदर्भातील उपाययोजना करता याव्यात म्हणून ध्वनी प्रदूषणाबाबत आणि वायू प्रदूषणाबाबत सातत्याने काम करणाऱ्या आवाज फाउंडेशनच्या सुमेरा अब्दुल अली यांनी महापालिकेकडे निवेदन दिले होते. शिवाय यासंदर्भात सर्वसामान्यांना माहिती देणारी यंत्रणा उभी करावी किंवा लहान मुले, महिला, रुग्ण यांना त्रास होणार नाही यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली होती. मात्र अद्याप याबाबत ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही.

पाऊस पडतो तेव्हा हवेमध्ये असणारी प्रदूषके पावसाच्या पाण्यासोबत जमिनीवर येतात किंवा पावसाच्या पाण्यात वाहून जातात. मात्र आता पाऊस थांबला आहे आणि वारादेखील थांबला आहे. त्यामुळे वातावरणामध्ये असलेले हे सगळे धुलिकण एका जागी स्थिर असल्याने मुंबई प्रदूषणात हरवल्याचे चित्र आहे.    - अथ्रेया शेट्टी, हवामान अभ्यासक

टॅग्स :मुंबई