Mumbai: पावसाने आयुक्तांना आणले ‘रस्त्यावर’, पाणी साचणाऱ्या भागांत जाऊन उपाययोजनांची केली पाहणी, कर्मचाऱ्यांना लावले कामाला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 12:45 PM2023-06-29T12:45:47+5:302023-06-29T12:46:00+5:30
Mumbai: मुसळधार पावसामुळे महापालिकेच्या सर्व यंत्रणा तत्पर राहत मुंबईकरांना जाच होऊ नये म्हणून अखेर भर पावसात मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनाच स्वत: रस्त्यावर उतरावे लागले.
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात दुपारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. मुसळधार पावसामुळे महापालिकेच्या सर्व यंत्रणा तत्पर राहत मुंबईकरांना जाच होऊ नये म्हणून अखेर भर पावसात मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनाच स्वत: रस्त्यावर उतरावे लागले. मिठी नदी, वाकोला पपिंग स्टेशन, धारावी टी जंक्शन, गांधी मार्केट आणि हिंदमातासारख्या पाणी साचणाऱ्या भागांत जाऊन आयुक्तांनी महापालिकेची यंत्रणा पावसाच्या पाण्याचा निचरा करत असल्याची खात्री करत कर्मचाऱ्यांना कर्तव्यदक्ष राहण्याचे निर्देश दिले.
२४ आणि २८ जून रोजी मुंबईत कमी वेळेत अधिक पाऊस झाला. मात्र सखल भागांमध्ये तुलनेत पाण्याचा निचरा जलदगतीने झाला. महापालिकेची यंत्रणा व्यवस्थित कार्यरत असल्याचा हा मापदंड असल्याचा दावा आयुक्त चहल यांनी केला. मुंबईत होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पाणी निचरा करण्यासह इतर कामांची पाहणी करण्यासाठी आयुक्तांनी बुधवारी पाहणी दौरा केला.
पावसात नागरिकांची गैरसोय होणार नाही, यासाठी पूर्ण तयारीनिशी उपाययोजना करण्यात आली आहे. नागरिकांनी नाल्यांमध्ये कचरा टाकू नये, जेणेकरून कचरा अडकून नाले तुंबणार नाहीत. पाण्याचा जलद निचरा होत राहील. असे आवाहन चहल यांनी केले. आयुक्तांसोबत पालिकेचे अन्य अधिकारीही उपस्थित होते.
चार दशकांनंतर दिलासा; व्यापारी काय म्हणाले
गांधी मार्केट येथील लघु उदंचन केंद्राची पाहणी करताना चहल यांनी स्थानिक नागरिक तसेच व्यापाऱ्यांशी संवाद साधला. स्थानिक व्यापारी हरिओम झुल्का म्हणाले की, दरवर्षी पावसाचे पाणी साचून आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत होते. आता गेल्यावर्षापासून पाणी साचत नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पावसातही रस्त्यावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे.
आयुक्त कुठे गेले?
सागरी सेतूलगत खान अब्दुल गफार खान मार्ग, वांद्रे-कुर्ला संकुलातील मिठी नदी परिसर, धारावी टी जंक्शन, शीव येथील गांधी मार्केट (सायन), हिंदमाता परिसर आणि सेंट झेव्हियर्स मैदान येथे भेट देत उपाययोजनांचा आढावा घेतला.
महापालिका काय करत आहे?
सखल भागात पाणी निचरा करण्यासाठी ४८० पंप ऑपरेटरची यंत्रणा सज्ज.
पाण्याचा निचरा जलदगतीने व्हावा यासाठी यंत्रणेकडे समन्वय साधण्यात येत आहे.
आयुक्तांनी काय दावे केले?
नाल्यातून गाळ काढण्याच्या कामात खोलीकरण करण्यात आले आहे.
दरवर्षी होणाऱ्या गाळ काढण्याच्या कामांच्या तुलनेत यंदा अधिक गाळ काढून कामे पूर्ण करण्यात आली आहेत.
जोरदार पावसातही मिठी नदी परिसरात झोपडपट्टी परिसरात पावसाचे पाणी शिरले नाही.