Join us

उपचार अर्धवट सोडणाऱ्यांचे प्रमाण तीन टक्क्यांवर, टाटा रुग्णालय प्रशासनाने दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 8:18 AM

Tata Hospital : रुग्णालय प्रशासन या मुलांच्या उपचारासाठी लागणारा खर्च ते त्यांच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च यांची तरतूद करत असल्याने गेल्या वर्षी  लहान मुलांमधील कॅन्सरचे उपचार अर्धवट सोडणाऱ्यांचे प्रमाण ३ टक्क्यांवर आणले असल्याची माहिती टाटा रुग्णालय प्रशासनाने दिली. 

मुंबई - कॅन्सरच्या उपचाराची भीती सगळ्यांनाच वाटते. आर्थिक खर्च आणि राहण्याची सोय नसल्याने २००७ - ०८ वर्षात लहान मुलांमधील कॅन्सरचे उपचार अर्धवट सोडण्याचे प्रमाण २५ टक्के होते. मात्र रुग्णालय प्रशासन या मुलांच्या उपचारासाठी लागणारा खर्च ते त्यांच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च यांची तरतूद करत असल्याने गेल्या वर्षी  लहान मुलांमधील कॅन्सरचे उपचार अर्धवट सोडणाऱ्यांचे प्रमाण ३ टक्क्यांवर आणले असल्याची माहिती टाटा रुग्णालय प्रशासनाने दिली. टाटा रुग्णालयात येणारे ८० टक्के रुग्ण जनरल विभागातून उपचार घेतात.  रुग्णालयाच्या बाल विभागातील रुग्णांची समस्या लक्षात आल्यानंतर  इम्पॅक्ट फाउंडेशन नावाची संस्था २०१० मध्ये सुरू झाली. या संस्थेत दानशूर व्यक्ती, खासगी कंपन्या यांनी सीएसआरच्या माध्यमातून निधी दिला.  

 याबाबत अधिक माहिती देताना या संस्थेच्या समन्वयिका शालिनी जातीया यांनी सांगितले की, अर्धवट उपचार सोडणाऱ्यांची माहिती घेतल्यावर असे लक्षात आले की, हे रुग्ण घरापासून खूप लांब कॅन्सरचे उपचार घेण्यासाठी येतात. मात्र या ठिकाणी आल्यावर त्यांना उपचाराचा खर्च, राहण्याची सोय नसणे, मुलीचे उपचार असतील तर अर्धवट सोडून जाणे आणि कॅन्सरच्या उपचारांबद्दल असणारे गैरसमज आणि चुकीची माहिती ही कारणे आहेत. आम्ही संस्थेच्या माध्यमातून त्या गरीब रुग्णांच्या उपचाराचा खर्च देण्यासाठी मदत करण्यास सुरुवात केली. त्यांच्या खाण्याची - राहण्यासाठी इतर संस्थांच्या माध्यमातून मदत केली. तसेच त्यांना त्या कालावधीत शिक्षण देणे, उपचार घेऊन गेल्यावर नियमित फॉलो अपसाठी आठवणीने त्यांना बोलाविणे. तसेच त्यांच्या शिक्षणासाठी लागणारी स्कॉलरशिप त्यांना देणे, मार्गदर्शन करणे या सगळ्या गोष्टी करण्यास सुरुवात केली.  

  रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले  केवळ डॉक्टरांचे उपचार देऊन रुग्ण बरे होतात असे नाही; तर त्यांनी उपचार पूर्णपणे घ्यावेत त्यासाठी त्यांना काही काळ मुंबईत राहावे लागते. त्यांना राहण्याची सोय नसल्याने ते फूटपाथवर राहत होते. त्यामुळे त्यांना संसर्ग व्हायचा. तसे होऊ नये म्हणून संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या राहण्याची, खाण्याची सोय करण्यात आली. उपचाराचा भार उचलण्यात आला. तसेच त्यांना समुपदेशकाकडून मार्गदर्शन करून योग्य माहिती देण्यात आली. त्यामुळे अर्धवट उपचार सोडणाऱ्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली असून त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे.  - डॉ. श्रीपाद बाणावली, संचालक आणि अधिष्ठाता (शैक्षणिक), टाटा रुग्णालय

टॅग्स :कर्करोगहॉस्पिटलआरोग्य