बुलढाणा: ...म्हणून केस गळू लागले, टक्कल पडण्याचे धक्कादायक कारण आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 05:28 IST2025-02-06T05:26:17+5:302025-02-06T05:28:56+5:30
सिलेनियमचे प्रमाण वाढले, झिंकचे कमी झाले... म्हणून केस गळू लागले; जमिनीतील पाणी वापरणे बंद करावे लागेल

बुलढाणा: ...म्हणून केस गळू लागले, टक्कल पडण्याचे धक्कादायक कारण आले समोर
-अतुल कुलकर्णी
मुंबई : बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास १५ गावांमध्ये अनेकांच्या डोक्यावरचे केस गळू लागले. याचा शोध घेण्यासाठी केंद्र सरकारपासून अनेक एजन्सीज त्या गावांत गेल्या. तपासण्या झाल्या. नेमके काय घडले हे कोणीही सांगायला तयार नाही. मात्र विंचूदंशावर औषध शोधणारे डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी स्वतः त्यांच्या टीमसह या भागाला भेट दिली. स्वखर्चाने या भागातील पाणी, धान्य, रक्ताचे नमुने यांची तपासणी केली. त्यातून आलेले निष्कर्ष धक्कादायक आहेत.
ज्यांच्या डोक्यावरचे केस गळत आहेत, त्यांच्या शरीरात सेलेनियमचे प्रमाण दहापटींनी जास्त आढळून आले; तर शरीरातील रक्ताच्या नमुन्यात आवश्यक असणाऱ्या झिंकचे प्रमाण एकदम कमी झाल्यामुळे हा प्रकार घडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे. या भागातील लोकांना पिण्याचे पाणी रोज विकत घ्यावे लागत आहे, यासारखे दुर्दैव नसल्याचे डॉ. बावस्कर म्हणाले.
सेलेनियम प्रचंड वाढले
डॉ. बावस्कर यांनी या भागातील राख, माती, कोळसा, नदीचे, अंघोळीचे आणि पिण्याचे पाणी तपासण्यासाठी घेतले होते. मुंबईत एजीलस फडके लॅबमध्ये वेगवेगळ्या तपासण्याही त्यांनी केल्या आहेत.
धक्कादायक निरीक्षणे
या भागातील जमीन खारपान पट्ट्यातील आहे. अल्कलाइन सॉइलमुळे जिप्समचे प्रमाण कमी झाले आहे. मुळात जमीन अल्कलाइन, त्यात डीएपी, फॉस्फेट अशा खतांच्या अतिवापरामुळे मातीत येणाऱ्या धान्यात झिंकचे प्रमाण वाढत नाही व ते पाण्यात विरघळून जमिनीत मुरते. रेशन दुकानात मिळणाऱ्या गव्हातदेखील सेलेनियम वाढल्याची माहिती आयसीएमआर संस्थेने लक्षात आणून दिले. ते कुठून वाढले हा प्रश्न अजूनही सुटलेला नसल्याचे डॉ. बावसकर यांचे निरीक्षण आहे.
यात सरकारने तातडीने हस्तक्षेप केला पाहिजे. सेलेनियमचे एवढे प्रमाण आले कुठून, हे युद्धपातळीवर शोधले पाहिजे. सेलेनियमचे प्रमाण मर्यादित असले पाहिजे. त्यासाठी सरकारनेच जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. आत्तापर्यंत अडीचशे रुग्ण समोर आले आहेत. यात रुग्ण दगावणार नाही. मात्र मुलींना याचा मोठा धक्का बसला आहे. गावात कोणी येईनासे झाले आहे. मुलींना केस गळल्यामुळे लग्न करण्यात अडचणी येत असल्याचे डॉ. बावस्कर म्हणाले.
उपाय काय ?
अल्कलाइन सॉइल असल्यामुळे फॉस्फेटचा वापर कमी करावा लागेल. जिप्समचा वापर वाढवावा लागेल.
सेलेनियम आले कुठून हे शास्त्रीय दृष्टीने शोधावे लागेल. संपूर्ण पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी लागेल.
जमिनीतून किंवा बोअरमधून वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा वापर बंद करावा लागेल. लोकांना पिण्याचे चांगले पाणी द्यावे लागेल.
मी आणि माझ्या टीमने बोंदगाव, मच्छिंद्रखेड, आदी गावांत भेट दिली. जवळपासच्या १५ गावांवर याचा परिणाम झाला आहे. पाच वर्षे वयापासून ८० वर्षे वयापर्यंतच्या लोकांचे केस जात आहेत. तीन ते चार दिवसांत टक्कल पडत आहे. याचे कारण लोकांच्या शरीरात सेलेनियमचे वाढलेले आणि झिंकचे कमी झालेले प्रमाण हे मुख्य कारण आहे. त्यासाठी त्यांनी तूर, हरभरा, गहू, ज्वारी या धान्यांची तसेच केसांचीदेखील तपासणी केली. धान्यात सेलेनियम बॉर्डर लाइनवर तर झिंक एकदमच कमी आहे. माती, कोळसा व राखेत फॉस्फरस जास्त आहे. यामुळे इथली एकूणच खानपान प्रक्रिया बिघडून गेली आहे. -डॉ. हिम्मतराव बावस्कर
सेलेनियमच्या रुग्णांच्या शरीरात प्रतिलिटर किती मायक्रोग्रॅम प्रमाण असावे याचे काही निकष आहेत. यासाठी पार्किंग एल्मर इक्विपमेंट पद्धतीनुसार तपासणी करण्यात आली होती. काही रुग्णांच्या शरीरात हे प्रमाण ५ ते ४ हजार मायक्रोग्रॅम आढळून आले आहे. हे अत्यंत गंभीर आहे. -डॉ. अविनाश फडके (अध्यक्ष, ऍजीलस फडके लॅब)