लाल परी पुन्हा थांबणार! गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वात एसटीचा उद्यापासून संप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2023 04:03 PM2023-11-05T16:03:33+5:302023-11-05T16:03:45+5:30
एसटीचा संप आता पुन्हा एकदा सुरू होणार आहे.
मुंबई- एसटीचा संप आता पुन्हा एकदा सुरू होणार आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वात एसटी कष्टकरी जनसंघ उद्यापासून संप पुकारणार आहे. सातवा वेतन आयोगासह इतर मागण्यांसाठी हा संप असणार आहे. सरकारने मागण्यांवर चर्चा करावी अन्यथा ६ नोव्हेंबरपासून आम्ही संप करणार आहे, असा इशारा वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दिला.
अजित पवार यांचं वय लहान, पुढच्या काळात संधी मिळू शकते; शिंदे गटाचे आमदार स्पष्टच बोलले
महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर होते, तेव्हाही एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी ६ महिने एसटी संप केला होता. यात सरकारने काही मागण्या मान्य केल्या होत्या. दरम्यान, आता पुन्हा एकदा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचारी संपावर जाणार आहेत. यामुळे राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही गुणरत्न सदावर्ते यांना टोला लगावला आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या, गुणरत्न सदावर्ते यांना लोक आता स्विकारतील का? एसटी आंदोलन दिवाळीच्या तोंडावर सुरू करायचे म्हणजे हे एक राजकारण आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे सदावर्ते हे देवेंद्र फडणवीस यांचा माणूस आहे असं बोललं जात आहे. एसटी चा बंद म्हणजे मी फडणवीस यांचा माणूस नाही हे सांगण्याचा भाबडा प्रयत्न आहे, असा टोला अंधारे यांनी लगावला.
गुणरत्न सदावर्ते हे आता फडणवीस सरकारमध्ये असतानाही आंदोलन करत आहेत. त्यांना आता लोक स्विकारतील का हे महत्वाच आहे, असंही अंधारे म्हणाल्या.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन आता सरकारकडूनही प्रतिक्रिया आली आहे. मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर ताबडतोड संवाद साधला जाणार आहे. दिवाळीच्या तोंडावर संपावर जाऊ नये म्हणून प्रयत्न करणार आहे, असंही मुनगंटीवार म्हणाले.