Join us

बदल्यांना मुदतवाढ राजकीय भूमिकेतून, आमदारांची नाराजी वाढू नये म्हणून खेळी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 7:11 AM

आमदारांची नाराजी वाढू नये म्हणून खेळी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने प्रशासकीय बदल्यांना ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. एकाच आठवड्यात दोन वेगवेगळे आदेश काढून या बदल्यांना मुदतवाढ दिली गेली. मात्र, प्रशासकीय बदल्यांच्या मुदतवाढीमागे राजकीय कारण असल्याचे समोर आले आहे. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमदारांची नाराजी वाढू नये म्हणून महाविकास आघाडीने ही सावध खेळी केल्याचे पुढे आले आहे.

राज्यात सध्या राज्यसभा निवडणुकीमुळे वातावरण तापले आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या निवडणुका आहेत. तर, दोनच दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या दहा जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. जून महिन्यात होणाऱ्या राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकांमध्ये आमदार हा मतदार आहे. आमदारांकडून महसूल, गृह, सार्वजनिक बांधकाम, कृषी, जलसंपदा आदी अधिकारी वर्गांच्या बदल्यांसाठी आग्रह धरला जातो. त्यातील बहुतांश बदल्या प्रशासकीयदृष्ट्या विभागाला अडचणीच्या असतात, त्यामुळे बदली केली जात नाही. त्यामुळे आमदार नाराज होतो. 

मंत्रालयात इच्छुकांची भाऊगर्दी वाढणारआगामी विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदारांची नाराजी परवडणारी नाही, त्यामुळे बदल्या पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे कळते. दरम्यान सर्वच विभागांनी ३१ मेपर्यंत बदल्या करण्याच्या दृष्टीने नियोजन केले होते, आता पुन्हा महिनाभर मंत्रालयात इच्छुकांची भाऊगर्दी वाढणार.

टॅग्स :उद्धव ठाकरेबदलीमंत्रालय