मुंबई - राज्यात गेल्या काही दिवसांपासून संभाजीराजे यांच्या राज्यसभा खासदारकीवरुन राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेनेनं संभाजीराजेंना शिवबंधन बांधून खासदारकीची ऑफर दिली होती. मात्र, त्यांनी स्पष्ट शब्दात नकार देत राज्यसभा निवडणुकीत आपण स्वाभीमान जपल्याचं म्हटलं. तसेच, या निवडणुकीतून माघारही घेतली. एकूणच याप्रकरणी शिवसेना प्रवक्ते संजय राऊत आणि शिवसेनेवर मराठा संघटनांनी नाराजी दर्शवली आहे. आता, संजय राऊत यांना शिवसेनेन कोल्हापूरचीच जबाबदारी दिली आहे.
शिवसेनेनकडून राज्यसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिवसेनेचे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार आणि मी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. शिवसेनेच्या उमेदवारांना संपूर्ण महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे, त्यामुळे विजय निश्चित असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. दरम्यान, संभाजीराजे यांना पाठिंबा नाकारल्याने शिवसेना आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर मराठा संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच, कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांना ही उमेदवारी दिली. त्यामुळे, वेगळाच राजकीय सामना पाहायला मिळत आहे.
राजश्री शाहू महाराजांच्या गादीचे वंशज असलेल्या महाराष्ट्रासह संभाजीराजेंना कोल्हापूरात मानाचं स्थान आहे. कोल्हापूर ही जन्मभूमी आणि कर्मभूमी असल्याने इथे त्यांच चाहता वर्गही मोठा आहे. मात्र, आता याच कोल्हापूरची जबाबदारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांच्याकडे दिली आहे. त्यामुळे, आता कोल्हापूरात जाऊन शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून पक्षवाढीसाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं, संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे, आगामी महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना आणि संजय राऊत कोल्हापुरात कशारितीने अभियान राबवतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
ओवेसींच्या भिवंडी दौऱ्यावर भाष्य
असदुद्दीन औवेसी हे खासदार आहेत, संसदेचे सदस्य आहेत, त्यांच्या पक्षाची भूमिका आणि आमची भूमिका यात टोकाचे अंतर आहे. पण, जोपर्यंत ते भिवंडीत येऊन कायद्याचे उल्लंघन करत नाहीत, तोपर्यंत त्यांच्यावर बंधने लादता येणार नाहीत. पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने हा विषय घ्यायचा असतो, त्यावर मी बोलणे योग्य नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले. ओवेसी हे पूर्ण देशात फिरत असतात, ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला त्यांची गरज असते, त्या त्या ठिकाणी ते जातात, हा त्यांचा इतिहास आहे. भिवंडीमध्ये देखील त्यांना बोलावले गेले आहे, असे वाटते. पण, भिवंडीची जनता देखील आता विचार करून निर्णय घेणारी आहे, ओवेसी असो वा तर कोणी असो, जो कोणी आपल्या देशामध्ये विष पसरविण्याचे काम करत असेल, तर येथील मुस्लिम बंधू ओवेसींना समर्थन देणार नाहीत, असेही राऊत यांनी म्हटले.