मतदानाच्या नियोजनाची जबाबदारी बड्या नेत्यांकडे, विधानभवनात दिवसभर उत्साह; तणाव अन् दावे-प्रतिदाव्यांचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 11:08 AM2022-06-21T11:08:49+5:302022-06-21T11:14:38+5:30

Vidhan Parishad Election: विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने विधानभवनात दिवसभर उत्साह, तणाव अन् दावे-प्रतिदावे यांचा माहोल बघायला मिळाला. मतांची जुळवाजुळव करण्याचे सगळ्यात मोठे आव्हान समोर असलेले भाजप व काँग्रेसचे नेते अधिक तणावात दिसत होते.

The responsibility of planning the polls lies with the big leaders, all day long in the Vidhan Bhavan; An atmosphere of tension and counter-claims | मतदानाच्या नियोजनाची जबाबदारी बड्या नेत्यांकडे, विधानभवनात दिवसभर उत्साह; तणाव अन् दावे-प्रतिदाव्यांचे वातावरण

मतदानाच्या नियोजनाची जबाबदारी बड्या नेत्यांकडे, विधानभवनात दिवसभर उत्साह; तणाव अन् दावे-प्रतिदाव्यांचे वातावरण

Next

मुंबई : विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने विधानभवनात दिवसभर उत्साह, तणाव अन् दावे-प्रतिदावे यांचा माहोल बघायला मिळाला. मतांची जुळवाजुळव करण्याचे सगळ्यात मोठे आव्हान समोर असलेले भाजप व काँग्रेसचे नेते अधिक तणावात दिसत होते. मतदानाच्या नियोजनाची जबाबदारी चारही पक्षांच्या बड्या नेत्यांनी घेतली होती.
आम्हीच  जिंकणार असा दावा मतदानानंतर सगळेच पक्ष करीत होते, पण मतदानादरम्यान फारसे कोणी माध्यमांना सामोरे गेले नाही. 
गुप्त मतदानामुळे उत्सुकता वाढविणाऱ्या या निवडणुकीचे मतदान सकाळी ९ वाजता  विधानभवनात सुरू झाले. आमदार एकामागून एक विधानभवन परिसरात दाखल होत असताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता. एरवी कॅमेऱ्यासमोर जाऊन भूमिका मांडणारे शिवसेनेचे अनिल परब, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, भाजपचे गिरीश महाजन हे गाडीतून उतरून लगेच विधानभवनात गेले. पत्रकारांनी त्यांना आवाज दिला असता ते फक्त नमस्कार करून पुढे गेले. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार, शिवसेनेचे भास्कर जाधव जिंकण्याचा दावा करीत काही मिनिटे माध्यमांशी बोलले. चारही पक्षांनी आपापल्या आमदारांना पंचतारांकित हॉटेलांमध्ये मुक्कामी ठेवले होते. तेथून बसने ते विधानभवनात आले.
आपापल्या आमदारांच्या मतदानाची काळजी मोठ्या चारही पक्षांचे नेते घेत होते. पहिल्या पसंतीची, दुसऱ्या वा नंतरच्या पसंतीची मते कोणाकोणाला द्यायची आहेत याची चिठ्ठी प्रत्येक आमदाराच्या हातात दिली जात होती. शिवसेनेच्या आमदारांच्या हातात स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिठ्ठ्या दिल्या. सोबत आदित्य ठाकरे, अनिल परब, अनिल देसाई होते.
प्रत्येक आमदार मतदानाला निघाले, की त्यांना शिवसेनेचे खासदार वा विधान परिषद सदस्य यापैकी एक जण सोबत करीत होता. 
भाजपच्या मतांचे नियोजन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करीत होते. मतांचा पॅटर्न प्रत्येकाला ते समजावून सांगत होते. घाई करू नका, शांतपणे मतदान करा, मतदान चुकता कामा नये, असे बजावून सांगत होते. राष्ट्रवादीच्या आमदारांना सर्व प्रकारच्या सूचना देण्याचे काम उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील करीत होते. अजित पवार यांनी सर्व सूत्रे घेतल्याचे दिसत होते. काँग्रेसमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात हे मुख्यत्वे आपल्या आमदारांना मतदान कसे करायचे, प्राधान्यक्रम कसा असेल ते सांगत होते. महाविकास आघाडीतील तीन पक्षांचे नेते एकमेकांना मते कशी, कोणत्या प्राधान्यक्रमाने द्यायच, याबाबत चर्चा करताना दिसत होते. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेदेखील काही वेळ विधानभवनात आल्या होत्या. मतदान संपेपर्यंत असलेला तणाव मतदानानंतर मात्र निवळल्याचे चित्र दिसले. 

सत्ताधारी-विरोधक भेटी
- भाजपचे विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे हे अजित पवार यांना जाऊन भेटले. 
- देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब थोरात व अन्य 
काही काँग्रेस नेत्यांशी चर्चा केली, यावेळी हास्यविनोददेखील झाले.

 राणा यांनी यावेळी दाखविली नाही हनुमान चालीसा 
-राज्यसभा निवडणुकीच्या वेळी मतपेटीत मत टाकल्यानंतर भाजप समर्थित अपक्ष आमदार रवी राणा यांनी हनुमान चालीसा दाखविली होती. त्यामुळे त्यांचे मत रद्द करण्याची मागणी महाविकास आघाडीने केली होती. 
- राणा यांचे मत बाद झाले नाहीपण ते संकटात नक्कीच सापडले होते. भाजपच्या नेत्यांनी याबद्दल त्यांची चांगलीच कानउघाडणी केली होती. यावेळी त्याबाबत सावध असलेले रवी राणा हनुमान चालीसा सोबत तर घेऊन आले पण त्यांनी मतदानाच्या ठिकाणी ती दाखविली नाही.

Web Title: The responsibility of planning the polls lies with the big leaders, all day long in the Vidhan Bhavan; An atmosphere of tension and counter-claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.