मुंबईतील प्रदूषणाची जबाबदारी महापालिकेवर, तंत्रज्ञान खरेदी करणार, मंत्री दीपक केसरकर यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 05:31 AM2023-03-21T05:31:39+5:302023-03-21T05:31:56+5:30
माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनीही यासंदर्भात केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांकडे मुंबईतील रिफायनरी, खत कारखाने बाहेर पाठविण्याची मागणी केली असल्याची बाब मांडली.
मुंबई : मुंबईच्याप्रदूषणात बांधकामे, विकासकामांमुळे वाढ झाली आहे. हे प्रदूषण अन्य वायूंपेक्षा धूलिकणांचे अधिक आहे. त्यामुळे ते नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई महापालिकेला नोडल एजन्सी नेमण्यात आले असून, मुंबई महापालिका आयुक्तांनी यासाठी उच्चाधिकार समिती नेमली आहे. महापालिकेच्या माध्यमातून यासाठी आवश्यक तंत्रज्ञान खरेदी केले जाणार असून, धूलिकणांना एकत्र आणून त्यांना जमिनीवर आणण्याचे व तिथून त्यांना नष्ट करण्याचे काम या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून १५ दिवसांत सुरू होईल, अशी माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली.
आमदार सुनील शिंदे यांनी ९३ च्या प्रस्तावान्वये हा मुद्दा उपस्थित केला. मुंबईतील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत असून, मुंबईकर नागरिकांना ताप, खोकला या आजारांना सामोरे जावे लागत आहे. यावर ठोस उपाययोजना व्हायला हवी. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारात वाढ व्हायला हवी. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनीही यासंदर्भात केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांकडे मुंबईतील रिफायनरी, खत कारखाने बाहेर पाठविण्याची मागणी केली असल्याची बाब मांडली.
यावर उत्तर देताना केसरकर म्हणाले, प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा. लाँगटर्म उपाययोजना करण्यासाठी इलेक्ट्रिक बसेस बेस्टसाठी खरेदी करण्यात आल्या आहेत. मेट्रोचे काम वेगाने सुरू केले आहे. त्यामुळे ३० टक्के प्रदूषण कमी होणार आहे. प्रदूषण असले तरी ते धूलिकणांचे आहे. विकासकामे सुरू असल्याने धूळ होत असून, ज्या-ज्या ठिकाणी धूळ सुरू होते त्या - त्या ठिकाणी पाणी मारणे तसेच अशा ठिकाणी धूळ ॲब्झॉर्ब करणाऱ्या मशीन कम्पल्सरी करण्याचा प्रयत्न आहे.
फॉगिंगच्या इन्स्ट्रुमेंट महापालिका खरेदी करीत आहे. बेकरीमध्ये लाकडे जाळणाऱ्या ठिकाणी, स्मशानभूमीच्या ठिकाणी सीएनजी आणण्याचा विचार करीत आहोत. ही सर्व खरेदी महापालिकेमार्फत केली जात आहे. डम्पिंग ग्राउंडवरही या मशीन बसवल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.