Join us

रेल्वेच्या स्वच्छतागृहांची जबाबदारी महापालिकेकडे; सफाईसाठी पुढाकार घ्या, CM शिंदेंचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 7:42 AM

शहर आणि उपनगरांत मिळून रेल्वेची एकूण १०८ स्थानके आहेत.

मुंबई : रस्ते, पूल, स्कायवॉक यांची देखभाल आणि डागडुजी यांसारख्या अनेक जबाबदाऱ्या अन्य प्राधिकारणांकडून मुंबई महापालिकेच्या खांद्यावर आल्या असताना आता रेल्वेस्थानकांवरील स्वच्छतागृहांच्या साफसफाईची जबाबदारीही पालिकेवर टाकण्यात आली आहे.

सफाई काम करण्यासाठी आधीच पालिकेकडे सुमारे एक हजार सफाई कामगारांची कमतरता असताना रेल्वेसाठी पालिकेला अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे लागणार  आहे.  या सफाईचा खर्च रेल्वे देणार का, याविषयी काहीही स्पष्टता  नाही.  रेल्वेच्या स्वच्छतागृहांची जबाबदारी पालिकेवर टाकण्यात आल्यामुळे पालिकेच्या वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. शहर आणि उपनगरांत मिळून रेल्वेची एकूण १०८ स्थानके आहेत.

रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांची सफाई पालिकेने करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  गुरुवारी वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांना दिले. अलीकडच्या काळात अन्य प्राधिकरणे-महामंडळांकडे असलेले अनेक प्रकल्प पालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत. मुंबईतील पुलांच्या देखभालीची  जबाबदारी याआधी  महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे होती. हे पूल त्यांनी देखभालीसाठी पालिकेकडे दिले आहेत.

पूर्व द्रुतगती महामार्ग आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाची देखभाल आणि डागडुजी पूर्वी ‘एमएमआरडीए’ प्राधिकरण करीत होते. त्यांनीही हे दोन्ही मार्ग पालिकेकडे सुपूर्द केले आहेत. पूल आणि महामार्गावरील जाहिरातींतून मिळणारा महसूल मात्र महामंडळ आणि ‘एमएमआरडीए’ पालिकेला देत नाही. आम्ही  जबाबदारी घेतली आहे, मग आता महसूलही आमच्याकडे वर्ग करा, अशी विनंती पालिकेने या दोन्ही यंत्रणांकडे अनेकदा  केली आहे. या विनंतीची अद्याप दखल घेतलेली नाही. एकूणच मुंबईकरांना मूलभूत सुविधा पुरविताना आता पायाभूत सुविधांचे ओझेही पालिकेवर पडले आहे.

पावसाळ्यातील खर्चही पालिकेचाचपावसाळ्यापूर्वी रेल्वेच्या हद्दीतील नालेसफाई केली जाते. हे काम रेल्वे करून घेते. मात्र, त्यासाठीचा खर्च  पालिकेला करावा लागतो. याच धर्तीवर आता स्वच्छतागृहांच्या सफाईचा खर्चही पालिकेच्या गळ्यात पडणार अशी चर्चा आहे.

उभारणार आणखी प्रसाधनगृहेमुंबईत पालिकेची तीन हजार २०१ प्रसाधनगृहे आहेत. ‘म्हाडा’ची ३ हजार ६०० आहेत. पैसे द्या, वापरा तत्त्वावर ८४० आणि रहदारीचे रस्ते आणि महामार्गावर १०० प्रसाधनगृहे आहेत. पालिका आणखी काही प्रसाधनगृहे बांधणार आहे. शिवाय सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकासही करणार आहे. त्यासाठी मोठा खर्च आहे. त्यात आता रेल्वेच्या सफाईची भर पडणार आहे.

टॅग्स :रेल्वेमुंबई महानगरपालिकाएकनाथ शिंदे