मुंबई : राज्य सरकारच्या विविध योजनांचा आर्थिक भर मुंबई महापालिकेवर पडत असताना आता त्यात वन विभागाचीही भर पडली आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अखत्यारीतील कामे करण्यासाठी पालिकेला पाच कोटी रुपये खर्चावे लागले आहेत.
जी-२० परिषदेचे प्रतिनिधी मुंबई भेटीवर आले असताना ते उद्यानातील कान्हेरी गुंफेला भेट देणार होते. त्यावेळी वन विभागाचे व पालिकेचे अधिकारीही उपस्थित होते. त्यावेळी उद्यानाच्या आतील भागाचे रस्ते, प्रवेशद्वारावरील रस्त्यांची दुरुस्ती तसेच आवश्यक तेथे रंगरंगोटी करण्याचा निर्णय घेण्यात आला. कमी वेळेत हे काम पूर्ण करावे लागणार होते.
कमी कालावधीत कामे करण्यासाठी आमच्याकडे मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री नाही. त्यमुळे पालिकेने हे काम करावे असे उद्यान व्यवस्थापनाच्या वतीने पालिकेला सांगण्यात आले. कामाच्या बाबतीतही आणखी काही सूचना करण्यात आल्या. उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते कान्हेरी गुंफा तसेच लॉग हट पर्यंतच्या रस्त्यात सुधारणा करण्याची सूचना करण्यात आली. त्यामुळे कामाच्या खर्चात आणखी भर पडली. कान्हेरी गुंफा परिसरातील रस्त्याच्या कामासाठी आणखी पाच कोटी खर्च करावे लागले.
१) तातडीचे काम म्हणून निविदा काढत ताम्हणी पाडा प्रवेशद्वार ते कान्हेरी गुंफा पर्यंतचा रस्ता, लॉग हटते कान्हेरी चौकी पर्यंतच्या रस्त्यावर थर्मो प्लास्टिक पेंटिंग आदी कामे करण्यात आली.
२) या कामासाठी वनविभागाकडून पालिकेला काहीच पैसे मिळाले नाहीत. सगळा खर्च पालिकेला करावा लागला.
सरकारची कामे-
अलीकडच्या काळात राज्य सरकारने सुचवलेल्या काही योजना, पालकमंत्र्यांनी सुचवलेली कामे करण्यासाठी पालिकेवर आर्थिक बोजा पडला आहे. मुंबई सुशोभीकरणांतर्गत १७०० कोटी रुपयांचा भार पडला आहे. स्वच्छ मुंबई मोहिमेसाठी सुमारे ४०० ते ५०० कोटी रुपये खर्च करावे लागत आहेत. त्यात आता वनविभागाच्या कामांसाठीही पैसे द्यावे लागले आहेत.