निवडणूक यंत्रणा नि:पक्षपाती हे निकालानेच सिद्ध केले : एस. चोकलिंगम

By यदू जोशी | Published: June 7, 2024 05:42 AM2024-06-07T05:42:32+5:302024-06-07T05:45:16+5:30

निवडणूक याद्या अद्ययावत करण्याचा आयोगाचा मेगा प्लॅन, गृहनिर्माण सोसायट्यांच्या सचिवांनाही सामावून घेणार

The result proved that the electoral system is impartial : S. Chockalingam | निवडणूक यंत्रणा नि:पक्षपाती हे निकालानेच सिद्ध केले : एस. चोकलिंगम

निवडणूक यंत्रणा नि:पक्षपाती हे निकालानेच सिद्ध केले : एस. चोकलिंगम

मुंबई : निवडणूक यंत्रणा पक्षपाती असल्याचे आरोप होत होते. पण जो काही या निवडणुकीचा निकाल आला त्यावरून ही यंत्रणा नि:पक्षपाती असल्याचेच सिद्ध झाले आणि टीका करणाऱ्यांना परस्परच उत्तर मिळाले, अशी ठाम भूमिका राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत मांडली. 

मला निवडणूक निकालावर राजकीय प्रतिक्रिया द्यायची नाही, तो माझा प्रांतही नाही. निवडणूक आयोग म्हणून आम्ही सुरूवातीपासूनच पारदर्शक होतो. ज्या अधिकाऱ्यांबाबत तक्रारी आल्या त्यांची आम्ही स्वतंत्रपणे चौकशी केली. राजकीय दबावात अधिकाऱ्यांनी काम केल्याचे आम्हाला कुठेही जाणवले नाही, असे चोकलिंगम म्हणाले.

मतदारांची जास्तीत जास्त नोंदणी व्हावी आणि मतदार याद्यांमध्ये नावच नसल्याच्या तक्रारी दूर व्हाव्यात, यासाठी आयोग कोणता मेगा प्लॅन विधानसभा निवडणुकीपूर्वी राबविणार आहे, याची माहितीही त्यांनी या मुलाखतीत दिली. 

आता निवडणूक संपली, आपण मोठ्या जबाबदारीतून मुक्त झालात. संपूर्ण प्रक्रिया कितपत आव्हानात्मक होती? 
चोकलिंगम - पाच टप्प्यांमध्ये महाराष्ट्रात निवडणूक झाली. १०० मीटरची दौड एकदा पूर्ण करताना दमछाक होते. आम्हाला तर ती पाचवेळा पूर्ण करायची होती. ती पूर्ण केल्याचे समाधान
 आज आहे. राज्यातील निवडणूक भयमुक्त वातावरणात झाली. कुठेही फेरमतदान घेण्याची वेळ आली नाही. ईव्हीएमवरील मतदानाबाबतही शंका घेतल्या जात होत्या. पण निकालाने त्याचेही सडेतोड उत्तर दिलेले आहे. ईव्हीएममध्ये अजिबात छेडछाड करता येत नाही. 

अनेक नावे मतदार याद्यांमधून गहाळ झाल्याच्या तक्रारी होत्या, त्या विधानसभा निवडणुकीपूर्वी दूर करणार का? 
मतदार नोंदणी अधिक व्हावी म्हणून आयोग काय करणार?  

चोकलिंगम - आपले मतदार यादीत नाव आहे की नाही हे मतदार मतदानाच्या दिवशी बघतात. ते त्यांनी काही दिवस आधी बघितले तर यादीत नाव येण्यासाठी अर्ज करता येतो आणि नाव टाकले जाऊ शकते. शहरांमधील मतदार नोंदणी वाढावी, गळालेली नावे पुन्हा याद्यांमध्ये यावीत, यासाठी आम्ही नवीन पुढाकार घेत आहोत. गृहनिर्माण सोसायट्यांच्या सचिवांना या कामासाठी जबाबदारी दिली जाईल. सहकार कायद्याच्या कलम ७९ (अ) मध्ये तशी तरतूद आहे. तसा आदेश आधीही होता, तो नव्याने काढून त्याची कडक अंमलबजावणी केली जाईल. पोस्टमनचा आपल्या भागातील मतदारांशी नियमित संपर्क असतो. त्यांचेही या कामात सहकार्य घेण्याचा 
विचार आहे. एनजीओंची मदत घेण्याचाही विचार आहे. तसेच जनतेने त्यासाठी काही सूचना केल्या तर आयोग स्वागतच करेल. 

मतदार नोंदणीबाबतची प्रक्रिया काय असते? विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने काही वेगळे करणार आहात का? 
चोकलिंगम - लोकसभेला यादीत नाव नव्हते ते मतदार विधानसभेच्या दृष्टीने सजग राहून नाव समाविष्ट करून घेतील, अशी अपेक्षा आहे. दरवर्षी ऑक्टोबरमध्ये आयोगाकडून मतदारांच्या प्रारूप याद्या प्रसिद्ध केल्या जातात. डिसेंबरपर्यंत त्यावर हरकती घेऊन नाव समाविष्ट करण्याची संधी असते. जानेवारीत आम्ही अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करतो. पण यावेळी विधानसभा निवडणुकीपूर्वीच ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्याचे वेळापत्रक आयोग लवकरच जाहीर करेल.

Web Title: The result proved that the electoral system is impartial : S. Chockalingam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.