अभियांत्रिकी परीक्षांचे निकाल लागणार तरी कधी?; विद्यार्थी अन् पालक हवालदिल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 06:53 AM2022-08-12T06:53:01+5:302022-08-12T06:53:30+5:30
विद्यापीठाच्या अभियांत्रिकी पदवी परीक्षा १७ ते ३० मे या कालावधीत पार पडल्या.
मुंबई : मुंबई विद्यापीठातर्फे मे महिन्यात घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी परीक्षांचा निकाल ७० दिवस उलटूनही न लागल्याने विद्यार्थी आणि पालक हवालदिल झाले आहेत. निकालाला होत असलेल्या विलंबामुळे अनेकांना परदेशी शिक्षणाची संधी हुकण्याची भीती सतावत आहे. शिवाय या निमित्ताने पुन्हा एकदा ऑफलाइन परीक्षांचे निकाल लावण्यात विद्यापीठाचा परीक्षा विभाग नापास झाल्याची टीका विद्यार्थी संघटनांकडून केली जात आहे.
विद्यापीठाच्या अभियांत्रिकी पदवी परीक्षा १७ ते ३० मे या कालावधीत पार पडल्या. सार्वजनिक विद्यापीठ कायद्याच्या कलम ८९ मधील तरतुदीनुसार परीक्षांचा निकाल हा ३० ते ४५ दिवसांत जाहीर होणे अपेक्षित आहे. मात्र, अभियांत्रिकी परीक्षा होऊन ७० दिवस उलटल्यावरही विद्यार्थ्यांचे निकाल हाती न आल्याने परीक्षा व मूल्यमापन विभागाचा भोंगळ कारभार समोर आल्याची टीका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अमोल मातेले यांनी केली आहे.