हिंदुविरोधी आशय असल्याच्या तक्रारीने रोखला राज्य नाट्य स्पर्धेचा निकाल, दोन नाटकांवर अशीही सेन्सॉरशिप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 08:10 AM2023-01-05T08:10:33+5:302023-01-05T08:18:28+5:30

६१ वी मराठी हौशी राज्य नाट्य स्पर्धा सध्या राज्यात विविध केंद्रांवर सुरू आहे. चंद्रपूर केंद्रावर १६ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा पार पडली. परीक्षकांनी या स्पर्धेचा निकाल सांस्कृतिक राज्य संचालनालयाकडे पाठवला.

The results of the state drama competition were withheld on the complaint of anti-Hindu content, and censorship was also imposed on two plays | हिंदुविरोधी आशय असल्याच्या तक्रारीने रोखला राज्य नाट्य स्पर्धेचा निकाल, दोन नाटकांवर अशीही सेन्सॉरशिप

हिंदुविरोधी आशय असल्याच्या तक्रारीने रोखला राज्य नाट्य स्पर्धेचा निकाल, दोन नाटकांवर अशीही सेन्सॉरशिप

googlenewsNext

- दीपक भातुसे

मुंबई : राज्य नाट्य स्पर्धेच्या चंद्रपूर केंद्रावर नोव्हेंबर महिन्यात पार पडलेल्या राज्य नाट्य स्पर्धेचा निकाल एका तक्रारीमुळे सांस्कृतिक कार्य संचलनालयाने रोखून ठेवला आहे. यापूर्वी राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेली आणि विविध स्पर्धांमध्ये गाजलेली दोन नाटके हिंदुत्व विरोधी असल्याची तक्रार अभविपच्या एका पदाधिकाऱ्याने केल्याने मागील सव्वा महिन्यापासून हा निकाल जाहीर झालेला नाही.

६१ वी मराठी हौशी राज्य नाट्य स्पर्धा सध्या राज्यात विविध केंद्रांवर सुरू आहे. चंद्रपूर केंद्रावर १६ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा पार पडली. परीक्षकांनी या स्पर्धेचा निकाल सांस्कृतिक राज्य संचालनालयाकडे पाठवला. त्यानंतर साधारणतः स्पर्धा पार पडल्यानंतर दोन ते तीन दिवसात संचालनालय निकाल जाहीर करते. मात्र चंद्रपूर केंद्रावर सादर झालेल्या लेखक इरफान मुजावर लिखीत 'वृंदावन' आणि 'तेरे मेरे सपने' या नाटकातून हिंदुत्व विरोधी प्रसार सुरू असल्याची तक्रार अभविपच्या चंद्रपूर येथील शैलेश दिंडेवार यांनी केली आणि ही नाटके बाद करण्याची मागणी केली. या तक्रारीनंतर सांस्कृतिक कार्य संचलनालयाने शासनाकडे याबाबत मार्गदर्शन मागवल्याचे कारण देत आतापर्यंत हा निकाल थांबवून ठेवला आहे.

विशेष म्हणजे ही दोन्ही नाटके रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाने (सेन्सॉर बोर्ड) प्रमाणित केलेली आहे. 'वृंदावन' या नाटकासाठी इरफान मुजावर यांना राज्य शासनाच्या २०१६ साली पार पडलेल्या राज्य नाट्य स्पर्धेत उत्कृष्ट नाट्य लेखनाचा पुरस्कार  तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते मिळाला आहे. २०१६ पासून 'वृंदावन' या नाटकाचे राज्य नाट्य स्पर्धेसह अनेक नाट्य स्पर्धेत प्रयोग सादर झालेले आहेत. तर यंदाच्याच नाट्य स्पर्धेत सोलापूर केंद्रावर 'तेरे मेरे सपने' हे नाटक दुसरे आले असून ते अंतिम फेरीसाठी पाठवण्यात आले आहे.

'वृंदावन' नाटकात विधवा आश्रमात राहणाऱ्या विधवांची व्यथा आणि त्यांचे तिथे होणारे शोषण यावर भाष्य करण्यात आले आहे. मात्र हिंदु स्त्रीयांवरील अत्याचार दाखवल्याचे कारण देत या नाटकाला आक्षेप घेण्यात आला आहे. तर 'तेरे मेरे सपने' या नाटकात मध्यमवर्गीय जोडप्याने रंगवलेले स्वप्न दाखवले असून त्यांची मुलगी एका दंगलीत अडकते तेव्हा उस्मान नावाचा रिक्षा चालक तिला सुखरूप घरी सोडतो अशी कथा दाखवण्यात आली आहे. रिक्षावाला मुस्लिम दाखवल्याने या नाटकाला आक्षेप घेण्यात आला आहे.

या दोन्ही नाटकांविरोधातील तक्रारदाराला 'लोकमत'ने प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी फोन केला तेव्हा तो हिंदीत बोलत होता. मराठी बोला असे सांगितल्यानंतर 'मराठी टुटी फुटी आती है' असे सांगत आपल्याला मराठी बोलता येत नसली तरी समजते असे त्यांनी सांगितले. मागील आठवड्यात संचालनालयाने याबाबत दोन्ही नाटकाशी संबंधित लोक, ३ परीक्षक आणि तक्रारदार यांनी ऑनलाईन बैठक घेतली. तेव्हा आपली तक्रार कायम असल्याने तक्रारदाराने सांगितले आहे. 

राज्य नाट्य स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात अशा पद्धतीने एका तक्रारीच्या आधारे एक महिन्याहून अधिक काळ निकाल रखडलेला नाही. बिभीषण चवरे, संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई - प्रशासकीय कारणांमुळे आणि काही तांत्रिक अडचणींमुळे निकाल लांबला आहे. लवकरच निकाल लावला जाईल. शैलेश दिंडेवार, अभाविप, चंद्रपूर तक्रारदार - लेखक इरफान मुजावर यांच्या या दोन्ही नाटकातून हिंदु विरोधी मानसिकता दिसून येते. या दोन्ही नाटकांच्या संहितेवर सेंसर बोर्डाने पुन्हा विचार करायला हवा. हिंदु धर्म सोडून हे लेखक इतर विषयांवर लिहू शकतात का?

इरफान मुजावर, नाट्य लेखक - मी नाटकात ठराविक जातीचे, धर्माचे लोक वाईट आहेत हे दाखवले असते आणि आक्षेप घेतला असता तर मी समजू शकलो असतो. आपल्या देशातील आर्थिक-सामाजिक रचना बघितली तर बहुतांश ठिकाणी रस्त्यावर फळे विकरणारे, पंक्चरवाले, रिक्षावाले हे मुस्लीिम असतात. त्यामुळे ती बाब लक्षात घेऊन मुस्लिम पात्र दाखवले आहे. सीए दाखवाचा असता तर उच्चभ्रू समाजातील दाखवला असता. या नाटकात उलट मी हिंदु-मुस्लीम एकोपा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तक्रारदाराला समाजातील एकी, निर्दोष समाज बघायचा नसेल म्हणून ही तक्रार दिली असेल. मी माझ्या 'दोजख' या नाटकात मुस्लिम दहशतवाद, मुस्लिम धर्मातील चुकीच्या गोष्टीवर भाष्य केले आहे. त्या नाटकालाही राज्य सरकारचा उत्कृष्ट लेखनाचा पुरस्कार मिळाला आहे. लेखक म्हणून तेव्हा मला धर्म दिसत नाही. माणुसकीवर मी भाष्य करतो.

आशिष आंबाडे, निर्माता, वृंदावन 
कोरोना काळातील नाट्य स्पर्धेवरील स्थगिती वगळता 'वृंदावन' या नाटकाचे सहा वर्षे विविध केंद्रांवर प्रयोग झाले आहेत. आज या नाटकाविरोधात कुणीतरी तक्रार करतो आणि निकाल लांबवला जातो हे बरोबर नाही. स्पर्धेचे परीक्षण झालेले आहे, परीक्षकांनी गुण दिले आहेत. तुम्हाला जो निकाल द्यायचा तो द्या. आम्ही हिंदी नाट्य स्पर्धेसाठी या नाटकाची हिंदीतील संहिता स्पर्धेसाठी पाठवली आहे, ती प्रवेशिका मान्य झाली आहे.

Web Title: The results of the state drama competition were withheld on the complaint of anti-Hindu content, and censorship was also imposed on two plays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.