Eknath Shinde: "रिक्षावाल्याची रिक्षा काल सुसाट होती"; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर तिरकस बाण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 05:42 PM2022-07-05T17:42:35+5:302022-07-05T17:43:31+5:30
आपला इतिहास आणि राजकीय प्रवास उलघडला. त्यावरुन, आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर टिका केली आहे.
मुंबई - माझ्यासोबत जे ५० आमदार आहेत त्यांना सगळ्यांना २०२४ च्या निवडणुकीत निवडून आणणारच आणि आमच्या शिवसेना-भाजप युतीने २०० जागा जिंकल्या नाहीत तर मी राजकारण सोडून शेतावर जाईल, असा निर्धार मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी विधानसभेत बोलताना व्यक्त केला. तसेच, आपण शिवसेनेतून बंडखोरी केली असून हा उठाव असल्याचंही त्यांनी म्हटलं. शिवसेना, हिंदुत्व वाचविण्यासाठी, शिवसैनिकांसाठी आपण हा उठाव केल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी सोमवारी विधानसभेत तुफान भाषण केलं. आपला इतिहास आणि राजकीय प्रवास उलघडला. त्यावरुन, आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर टिका केली आहे.
शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर झालेल्या अभिनंदनपर भाषणांना उत्तर देताना शिंदे म्हणाले की, जे घडले ते एका दिवसात घडलेले नाही. एकीकडे पक्षाकडून मला चर्चा करा म्हणत होते, दुसरीकडे मला पक्षनेतेपदावरून काढून टाकले. मुख्यमंत्रिपदासाठी मी उठाव केला नाही. आमच्यासोबतच्या आमदारांच्या अस्तित्वाचा प्रश्न होता. भाजपसोबत चला असे मी उद्धवजींना पाचवेळा सांगितले. पण, मला अपयश आले. स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी करणारा पक्ष (काँग्रेस) आमच्यासोबत होता, पण आम्ही काही बोलू शकत नव्हतो, अशी आपली अडचण त्यांनी विधानसभेत बोलताना सांगितली. त्यानंतर, आज उद्धव ठाकरेंनी महिला पदाधिकाऱ्यांसाठी मेळावा घेतला, त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर नाव न घेता टिका केली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना महिला संघटक, संपर्कप्रमुख, महिला विभाग संघटक यांची आज शिवसेना भवन येथे बैठक झाली.
— ShivSena - शिवसेना (@ShivSena) July 5, 2022
यावेळी उद्धवसाहेबांनी शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. pic.twitter.com/btnjFjrLas
शिवसेना महिला संघटक आणि संपर्कप्रमुख, संघटक यांची शिवसेनाभवनात बैठक संपन्न झाली. अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना याप्रसंगी व्यक्त केल्या. त्यानंतर, उद्धव ठाकरेंनीही महिला पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी, एकनाथ शिंदेंवर जबरी टिका केली. ''काल रिक्षावाल्याची रिक्षा सुस्साट सुटली होती, ब्रेकच लागत नव्हता'', असा टोला उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना लगावला. तसेच, काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरचा माईक खेचला, पुढे काय काय खेचतील माहिती नाही, असा खोचक टोमणाही त्यांनी मारला.
काय म्हणाले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आमदारांच्या घरावर दगडफेक केली गेली. त्यांचे पुतळे जाळण्यास सांगितले. तीस-पस्तीस वर्षे रक्ताचे पाणी आम्ही ज्या पक्षात केले त्यांनी आमचे खच्चीकरण केले. पण एक लक्षात ठेवा एकनाथ शिंदेच्या घरावर दगड मारणारा अजून पैदा झाला नाही. आमच्याकडे कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे, तरी आम्ही संयम ठेवला. पण संयमाची परीक्षा घेऊ नका, असे आव्हान शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता दिले. वयाच्या सतराव्या वषी शिवसैनिक झाल्यापासूनचा प्रवास सांगताना त्यांनी, अंगावर घेतलेल्या केसेस, ठाण्यातील सोळा लेडीज बार उद्ध्वस्त केल्याची घटना, ठार मारण्याचे झालेले प्रयत्न अशा घटनांचाही उल्लेख केला.
तेव्हा मीच मुख्यमंत्री होणार होतो...
महाविकास आघाडीचे सरकार आले तेव्हा मीच मुख्यमंत्री होणार होतो. पण पक्षातील काही नेत्यांनी खोडा घातला, असे म्हणताना शिंदे यांनी कोणाचे नाव घेतले नाही. तुम्हालाच मुख्यमंत्री करणार होते, पण तुमच्या पक्षातून विरोध झाला, आमचा विरोध नव्हता असे नंतर एकदा मला अजित पवार यांनी सांगितले. शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे, असे सांगितले असे म्हणत शिंदे यांनी पवार यांच्याकडेही बोट दाखविले.
शिवसेनेला त्रास कसा झाला त्याचे दिले दाखले
अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे शंभर आमदार जिंकविण्याचे लक्ष्य ठेवले होते. जयंत पाटील जिथे जायचे तिथे पुढचा आमदार आमचाच असे बोलायचे. मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी एकनाथ खडसेंच्या भीतीने वाँटेड आहेत, असे मला तिथले आमदार चंद्रकांत पाटील सांगत होते. सांगलीचे आमचे आमदार अनिल बाबर त्रस्त होते. आमचे पदाधिकारी आनंदराव यांना मोक्का लावला. राष्ट्रवादीत येण्यासाठी धमक्या दिल्या गेल्या. तो माझ्याकडे येऊन ओक्साबोक्शी रडत होता. एका मिनिटात त्याची फाईल रद्द करता आली असती, पण केले नाही.
पक्षाशी गद्दारी केली नाही
मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही आणि तसे झाले तर मी माझे दुकान बंद करेल, असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. उद्धव ठाकरे जळगावच्या सभेत म्हणाले होते की, आघाडी सरकारमुळे राज्याची १५ वर्षे सडली. मग अशावेळी आम्ही किती दिवस तुमच्याबरोबर बसणार होतो, असा सवाल शिंदे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीला केला. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना मी बाहेरून तीन मते आणली पण ते पडले. आमच्यातले लोक म्हणत होते की जो (संजय राऊत) आला तो पडायला पाहिजे होता. विधान परिषदेत आम्ही दोघांनाही निवडून आणले, पक्षाशी गद्दारी केली नाही, असे शिंदे म्हणाले.