मुंबई : गेट वे ऑफ इंडियावर रसिकांना देशभरातील विविध संगीताचा संगम घडवणारी विनामूल्य संगीत मैफल अनुभवता येणार आहे. नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टद्वारे सुरू केलेल्या मुंबई कौस्तुभ प्रकल्पाचा एक भाग म्हणून तीनवेळचे ग्रॅमी पुरस्कार विजेते रिकी केज यांचा लाइव्ह शो १९ मार्चला गेटवे ऑफ इंडिया येथे होणार आहे.
भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अधीनस्थ कार्यालय असलेल्या एनजीएमए, मुंबई आयोजित कार्यक्रमात रिकी केज यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘एनजीएमए अमृतमहोत्सव व्हिडिओ अँथम’चे लाँचिंगही करण्यात येणार आहे. शोबाबत रिकी म्हणाले की, देशाच्या विविध प्रांतांतील लोकगीतांच्या माझ्या आवृत्त्या या मैफलीत सादर करणार आहे.
मुंबईत लाइव्ह शो करणे हे माझे स्वप्न होते. त्यामुळे या कार्यक्रमासाठी खूप उत्सुक असल्याचेही रिकी म्हणाला. मुंबई कौस्तुभ कार्यक्रमाच्या माध्यमातून रिकी केज पाच वर्षांनंतर मुंबईत कार्यक्रम सादर करणार आहेत.