लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महायुतीत नाशिकच्या जागेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. ही जागा लढविण्यासाठी मंत्री छगन भुजबळ आग्रही असतानाच शिंदेसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनीही आपला दावा कायम ठेवला आहे. यासाठी पुन्हा एकदा त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन हा मतदारसंघ सोडू नये अशी विनंती केली. मुख्यमंत्र्यांचे ठाणे निवासस्थान ते चैत्यभूमी असा प्रवास मुख्यमंत्र्यांसोबत एकाच कारमधून करीत त्यांनी नाशिकमधून उमेदवारीचा आपला हट्ट कायम ठेवला.
मुख्यमंत्री शिंदे यांना आपले विद्यमान खासदार बदलून त्या जागी दुसरे उमेदवार द्यावे लागले. यवतमाळ वाशिममधून भावना गवळी यांची उमेदवारी बदलावी लागली तर हिंगोलीतून हेमंत पाटील यांच्या जागी दुसरा उमेदवार द्यावा लागला. अद्यापही रत्नागिरी-सिंधुदुर्ग, मुंबई दक्षिण, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या जागांचा तिढा सुटलेला नाही. रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून किरण सामंत यांना उमेदवारी मिळावी म्हणून मंत्री उदय सामंत हे मुख्यमंत्र्यांमागे आहेत. त्याचबरोबर गोडसे हेही आपला दावा कायम ठेवण्यासाठी वारंवार मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत. रविवारीही त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी नाशिक लोकसभेचा आढावा घेतल्याचे सांगितले.