वालभट नदी झाली रुंद, अतिक्रमणाचा विळखा हटला; मुंबई महापालिकेचा पुढाकार
By जयंत होवाळ | Published: June 20, 2024 06:28 PM2024-06-20T18:28:08+5:302024-06-20T18:28:34+5:30
पम्पिंग स्टेशनची संख्या वाढवणे, मुंबईतील प्रमुख नदी-नाल्यांचे रुंदीकरण करणे हे प्रमुख उपाय या अहवालात सुचवण्यात आले होते
मुंबई : वालभट नदीच्या भोवतालचा अतिक्रमणांचा विळखा हटवून नदीचे रुंदीकरण करण्याची मोहीम पूर्ण झाली आहे. या रुंदीकरणासाठी खाजगी जमिनीचा काही भाग मुंबई महापालिकेला ताब्यात घ्यावा लागला होता. त्यासाठी खाजगी जमीन मालकांना एक कोटी रुपयांहून अधिक रकमेची नुकसान भरपाई देण्यात आली आहे.
पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या पूर्वेकडून या नदीचा उगम होतो. कामा इंडस्ट्रिअल इस्टेट, शर्मा इस्टेट जवळून वाहत जाऊन पश्चिम रेल्वेला छेद देऊन पुढे तिवारी इस्टेट, राम मंदिर रोड येथून वाहत शेवटी ओशिवरा नदीला ही नदी जाऊन मिळविते. नदीच्या काही भागाचे बांधकाम बिनथरी दगडाचे असून काही बांधकाम काँक्रीटचे आहे. २६ जुलेच्या प्रलयानंतर ब्रिमस्टोवॅड समिती नेमण्यात आली होती. मुंबईत अतिवृष्टी झाल्यास पावसाचे पाणी साचून राहू नये , पाण्याचा निचरा वेगाने व्हावा , यासाठी काय उपाय योजना करता येतील, याविषयी या समितीने अहवाल सादर केला होता.
पम्पिंग स्टेशनची संख्या वाढवणे, मुंबईतील प्रमुख नदी-नाल्यांचे रुंदीकरण करणे हे प्रमुख उपाय या अहवालात सुचवण्यात आले होते. त्यात वालभट नदीच्या रुंदीकरणाचाही समावेश होता. त्यानुसार रुंदीकरणाचे कामे हाती घेण्यात आले होते. ही नदी ७ किमीच्या पट्ट्यात पसरली असून पश्चिम रेल्वेच्या वरच्या बाजूने २० मीटर आणि पश्चिम रेल्वेच्या खालच्या बाजूने ४० मीटर एवढे रुंदीकरण करण्यात आले आहे. या नदीच्या पात्राभोवती ७८० मीटर भागात अतिक्रमण झाले होते. या अतिक्रमणांना पालिकेने नोटीस दिली होती. त्यावर काही पात्र बाधितांनी पालिकेकडे नुकसान भरपाईची मागणी केली होती. त्यानंतर अतिक्रमित जागेची मोजणी करण्यात आली. ब्रिमस्टोवॅड अंतर्गत मिठी नदीच्याही खोलीकरणाची आणि रुंदीकरणाचीही कामे सुरु आहेत. या नदीसाठी आतापर्यंत हजारो कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. तरीही अजून कामे संपलेली नाहीत. या नदीचे काम एमएमआरडीए आणि पालिका करत आहे.