Join us

रस्ता काँक्रीट की डांबराचा, राजकारण्यांनी अंग काढले; सहा महिन्यांनी रस्त्याचे काम अखेर सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2024 10:40 AM

विक्रोळी-कन्नमवारनगरमधील रस्त्याचे काम अखेर सुरू.

मुंबई : काँक्रीट की डांबराचा, या राजकीय वादात अडकलेल्या विक्रोळी-कन्नमवारनगरमधील रस्त्याचे काम अखेर सुरू करण्यात आले आहे. स्थानिक राजकीय नेत्यांमध्ये  कुरघोडीमुळे पालिकेनेही मूळ आरखडा बदलला  आणि या गोंधळात जवळपास सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ रस्त्याचे काम रखडले होते. आता निवडणुकीच्या तोंडावर रस्त्याचे काम पुन्हा सुरू झाल्याने रस्ता काँक्रीटचा की डांबराचा या भानगडीतून राजकारण्यांनी अंग काढून घेतल्याचे दिसते.

कन्नमवारनगर येथील इमारत क्रमांक १ ते जुन्या पोलिस स्टेशनच्या पट्ट्यात काँक्रिटीकरणाचे काम सुरू झाले होते. मधल्या जवळपास २०० मीटरच्या पट्ट्यातील काम शिल्लक असताना स्थानिक राजकारण्यांनी हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली. या पट्ट्यात जुन्या जलवाहिन्या तसेच मलनिस्सारण वाहिन्या आहेत. 

नवा आराखडा कसा काय तयार झाला?

संपूर्ण पट्टा काँक्रीटचा करण्याचा मूळ आरखडा असताना मधल्या पट्ट्यातच रस्ता डांबराचा करण्याचा नवा आराखडा कसा काय तयार झाला? ज्याठिकाणी रस्ता काँक्रीटचा करण्यात आला आहे, त्या रस्त्याच्या खालीही जुन्या वाहिन्यांचे जाळे आहे. तेथे का प्रश्न निर्माण झाला नाही, असा सवाल करत स्थानिकांनी पालिकेच्या कारभारावर बोट ठेवले आहे. दुरुस्तीचा कामामुळे कंत्राटदाराचे नफ्याचे मार्जिन कमी होऊ नये म्हणून रस्ता डांबराचा केला जात आहे का, असा सवालही काहींनी केला.

याठिकाणी पुनर्विकासाची कामे सुरू असल्याने त्या अधूनमधून फुटतात. आधी  नव्या वाहिन्या टाका आणि त्यानंतर काँक्रिटीकरण करा, त्या आधी तात्पुरता डांबरी रस्ता करा,  असे काही  राजकीय पक्षांचे म्हणणे होते. तर,  रस्ता काँक्रीटचाच झाला पाहिजे,  असा आग्रह अन्य  राजकीय पक्षांचा होता. काम का ठप्प पडले होते, याविषयी पालिकेच्या ‘एस‘ वॉर्ड कार्यालयात कानोसा घेतला असता, स्थानिक राजकारण हेच मुख्य कारण असल्याच सूत्रांनी  सांगितले. 

तात्पुरत्या स्वरूपात रस्त्याचे काम हाती-

१) जुन्या जलवाहिन्या आणि मलनिस्सारण वाहिन्या न बदलता रस्ता काँक्रीटचा केला आणि या वाहिन्या फुटल्या तर दुरुस्तीसाठी काँक्रीटचा रस्ता खोदावा लागला असता. 

२) या वाहिन्या बदलेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात डांबरी रस्ता करावा, असा आमचा आराखडा होता. 

३) मात्र, काही राजकीय पक्षांच्या स्थानिक नेत्यांचा आग्रह काँक्रीटचा होता. दोन महिन्यांनी पावसाळा सुरू होणार आहे. 

४) रस्त्याचे काम न झाल्यास लोकांची गैरसोय झाली असती. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात रस्ता बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे, असे  सांगण्यात आले.

टॅग्स :मुंबईविक्रोळी