रस्ता खचला, वाहने कोसळली; पार्किंगच्या बेसमेंटसाठी काम सुरू असताना चुनाभट्टीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 06:31 AM2023-07-06T06:31:45+5:302023-07-06T06:31:54+5:30
चुनाभट्टीत येथील राहुलनगर भागात पूर्व द्रुतगती महामार्गालगत वसंत दादा पाटील हे अभियांत्रिकी महाविद्यालय आहे.
मुंबई : इमारतीचे बांधकाम सुरू असलेला रस्ता चुनाभट्टीत खचल्याचा प्रकार बुधवारी सकाळी घडला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी रस्त्यालगत उभ्या करण्यात आलेल्या चारचाकी व दुचाकी, अशा २४ पेक्षा अधिक गाड्या खचलेल्या खड्ड्यात पडल्या. दरम्यान, एसआरएकडून संबंधित विकासकाला काम थांबविण्याची नोटीस बजावण्यात आली असून, खड्ड्यातून वाहने काढण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते.
चुनाभट्टीत येथील राहुलनगर भागात पूर्व द्रुतगती महामार्गालगत वसंत दादा पाटील हे अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. या भागात एसआरएच्या तीन इमारती असून, बाजूलाच एका विकासकाकडून पार्किंगच्या बेसमेंटसाठी पायलिंगचे (खोदकाम) काम गेल्या काही आठवड्यांपासून सुरू होते. बुधवारी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास येथील जमीन खचण्यास सुरुवात झाली. बघताबघता जमिनीचा बराच भाग ५० फूट खोल खचला.
जमीन खचल्याने महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी पार्क केलेली वाहनेही खड्ड्यात कोसळली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सदर परिसर सील केला. खड्ड्यात पडलेली दोन चारचाकी व इतर दुचाकी वाहने बाहेर काढण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते. संबंधित विकासकाला काम तत्काळ थांबविण्याची नोटीस देण्यात आल्याची माहिती एसआरएच्या अधिकाऱ्यांनी दिली.
सुदैवाने कोणीही या घटनेत खड्ड्यात पडून दबलेले नाही, बचाव कार्य करताना जमीन खचत आहे. बेस तयार करून हळूहळू गाड्या वर काढण्याचे काम सुरू आहे. गुरुवारी सुद्धा गाड्या काढण्याचे काम सुरू असेल.
- रवींद्र आंबुलगेकर, मुख्य अग्निशमन अधिकारी (प्रभारी)