रस्ते तेच, पण चक्क २२ हजार वाहनांना पार्किंगसाठी जागा! डी वाॅर्डसह चार वार्डांमध्ये पालिका देतेय पार्किंग सुविधा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 11:11 AM2023-11-06T11:11:52+5:302023-11-06T11:12:03+5:30
पालिका लोकसंख्येची दाटी असलेल्या चार वॉर्डमध्ये २२ हजार वाहनांना रस्त्यांवर पार्किंगसाठी जागा देणार आहे.
मुंबई : वाहन आहे, पण पार्किंग कुठे करावे या चिंतेत असणाऱ्या मुंबईकरांना पालिका पार्किंग सुविधा उपलब्ध करून देत आहे. दिवाळीच्या तोंडावर जणू हा बोनस म्हणावा अशी किमया घडत आहे.
पालिका लोकसंख्येची दाटी असलेल्या चार वॉर्डमध्ये २२ हजार वाहनांना रस्त्यांवर पार्किंगसाठी जागा देणार आहे. याचा लाभ ग्रँट रोड, वाळकेश्वर, केम्प्स कॉर्नर, ब्रीच कँडी, गिरगाव, मुंबई सेंट्रल, मलबार हिल या डी वॉर्डमधील आणि वरळी, प्रभादेवी, लोअर परळ या जी दक्षिण वाॅर्डमधील तसेच अंधेरी पश्चिम भागातील या के पश्चिम वाॅर्डमधील आणि भांडुप, कांजूरमार्ग या भागातील एस वाॅर्डच्या वाहनधारकांना होईल.
मुंबईत वाहनांचा आकडा ४५ लाखांच्या पार गेला आहे. वाहतूककोंडी आणि पार्किंगची समस्या यामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना सुखावह वाटेल अशी बातमी पालिकेने दिली आहे. पालिकेने ‘ऑन स्ट्रीट पार्किंग’चा उतारा काढत एक अभिनव प्रयोग सुरू केला आहे. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात डी वॉर्ड, जी दक्षिण वॉर्ड, के पश्चिम, एस या चार वॉर्डांत त्याची अंमलबजावणी होणार आहे. या परिसरात एकूण २२ हजार वाहनांना पार्किंग उपलब्ध होणार आहे.
या ठिकाणी मोफत पार्किंग सेवा
याशिवाय पालिकेने रस्त्यांवरील पार्किंगच्या (ऑन स्ट्रीट पार्किंग) सुविधेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईतील २४ पैकी ११ वॉर्डांमध्ये शुल्क आकारून पार्किंग सुविधा दिली जाते.
यापैकीही सात वॉर्डांमध्येच ७ हजार ७९१ वाहने रस्त्यावर उभी केली जातात, तर चार वॉर्डांमध्ये रस्त्यांवरील पार्किंग विविध कारणांमुळे बंद झाली.
२४ पैकी उर्वरित १३ वॉर्डांमध्ये पालिकेकडून वाहनचालकांना रस्त्यांवर मोफत पार्किंग सेवा आहे.
ऑन स्ट्रीट पार्किंग कुठे ?
पहिल्या टप्प्यात ऑन स्ट्रीट पार्किंगमध्ये डी वॉर्डमध्ये १२७ ठिकाणी, जी दक्षिणमध्ये ८६, के पश्चिममध्ये २२० आणि एस वॉर्डमध्ये १०८ ठिकाणी पार्किंगची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.
ग्रँट रोड, गिरगाव, मुंबई सेंट्रल, मलबार हिल या डी वॉर्ड, वरळी, प्रभादेवी, लोअर परळ जी दक्षिण, अंधेरी पश्चिम या के पश्चिम आणि भांडुप पश्चिम या एस वॉर्डमध्ये रस्त्यांवरील पार्किंग सुविधेत वाढ केली आहे.
पार्किंग आणि ट्रॅफिक जॅमच्या समस्येवर मात करण्यासाठी याचा उपयोग होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.