मुंबई, ठाण्यातील रस्ते हाेणार एकदम ओक्के!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 06:52 AM2022-07-29T06:52:10+5:302022-07-29T06:52:54+5:30

कामांना गती देण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश

The roads in Mumbai, Thane will be completely OK! Eknath Shinde | मुंबई, ठाण्यातील रस्ते हाेणार एकदम ओक्के!

मुंबई, ठाण्यातील रस्ते हाेणार एकदम ओक्के!

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महानगर  प्रदेशातील (एमएमआर) रस्त्यांची कामे गतीने करण्यासाठी त्यांची वर्गवारी करून कमी, मध्यम मुदतीचे रस्ते प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिले.

संबंधित रस्त्यांसंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत शिंदे म्हणाले की, आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुख्य गोदामे, लॉजिस्टिक्स केंद्रे, कंटेनर-ट्रक टर्मिनल्समुळे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता, त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. ज्या भागात वाहनांची जास्त रहदारी असल्याने वाहतूक कोंडी होते, त्या भागातील वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी रस्ते आणि अनुषंगिक प्रकल्पांना गती द्यावी, नव्या प्रकल्पांचे सविस्तर प्रकल्प अहवाल एमएमआरडीएने तातडीने शासनाकडे सादर करावेत. वसई-विरार मल्टिमोडल कॉरिडॉरमुळे भिवंडी-कल्याण-डोंबिवली-उल्हासनगर या  भागातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, त्याबरोबरच त्या भागाच्या विकासालादेखील चालना मिळणार आहे, त्यामुळे हा प्रकल्प गतीने पूर्ण करा.  

पालघरमधील रुंदीकरणावर विशेष भर 
पालघर जिल्ह्यातील रस्त्यांच्या रुंदीकरणावर विशेष भर दिल्यास दळणवळणाच्या अंतर्गत सुविधा विकसित होणार आहेत, त्यामुळे पालघर जिल्ह्याच्या उद्योग-व्यवसायाला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. 
मुरबे-पालघर रस्त्यामुळे पालघरजवळील दापोलीकडे जाण्यासाठी लागणाऱ्या वेळेत बचत होईल आणि ३५ कि.मी. चे अंतर कमी होईल. 
विश्वभारती फाटा- भिनार-वडपा मार्गाचे कामदेखील मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाने करण्याच्या सूचना  शिंदे यांनी दिल्या.

शीळफाटा-भिवंडी रस्त्याच्या मोबदल्याची समस्या सुटणार
 शीळफाटा-कल्याण-भिवंडी रस्त्याच्या भूसंपादनापोटी देण्यात येणाऱ्या मोबदल्याचा विषय प्रलंबित असून, तो तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश शिंदे यांनी ठाणे जिल्हा प्रशासनाला दिले. 
 सर्व्हिस रोड- राजनोली ते दुगार्डी मार्गावरील अनधिकृत बांधकामे हटविण्याबरोबरच 
तेथील विस्थापितांसाठी ठाण्याच्या धर्तीवर 
पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

वाहतूककोंडी दूर होणार
आनंदनगर टोल नाका ते साकेत मार्ग, कोपरी-पटणी पूल, तीन हात नाका मार्गाची पुनर्बांधणी, भिवंडी जोडणारा पूल, ठाणे कोस्टल मार्ग, ऐरोली बोगदा ते काटई नाका मार्ग हे प्रकल्प जलदगतीने करण्यात येणार असून, या प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडी दूर होण्यास मोठी मदत होणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. 

Web Title: The roads in Mumbai, Thane will be completely OK! Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.