मुंबई :मुंबई उत्तर-पूर्व मतदारसंघातील प्रचार हळूहळू रंगात येऊ लागला आहे. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची भूमिका काय असू शकेल, याकडे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षाच्या उमेदवाराचे लक्ष लागले आहे. मात्र, वंचित आणि एमआयएमने अजून त्यांचे पत्ते उघड केलेले नाहीत.
२०१९ मधील मोदी लाटेत भाजपचे मनोज कोटक यांनी राष्ट्रवादीचे संजय पाटील यांचा पराभव केला होता. त्यानंतर पाटील यांनी उद्धवसेनेत प्रवेश केला. सध्या ते महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. यावेळी भाजप श्रेष्ठींनी कोटक यांना उमेदवारी नाकारल्याने स्थानिक भाजपला धक्का बसला. मनोज कोटक हे अनेक टर्म नगरसेवक होते. सुधार समितीचे अध्यक्ष व स्थायी समिती सदस्य या नात्याने या मतदारसंघात ते परिचित आहेत. मात्र, आता ते उमेदवार नाहीत. भाजपने मुलुंडचे आमदार मिहीर कोटेचा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे आज तरी या मतदारसंघात पाटील आणि कोटेचा यांच्यात मुख्य लढत होईल असे चित्र आहे.
समीकरणे बदलली -
बहुजन वंचित आघाडीने २०१९ मधील निवडणुकीत उमेदवार उभा केला होता. वंचितच्या उमेदवाराने ६८ हजार २३९ मते घेतली होती. मात्र, पाटील आणि कोटक यांच्या मतातील कमालीचा फरक लक्षात घेता पाटील यांच्या पराभवास वंचितचा हातभार लागला असे म्हणता येत नाही. यंदा मात्र राजकीय समीकरणे बदलली आहेत. आघाडी मैदानात आहे. भाजपसोबत शिंदेसेना असली तरी त्यांच्या ताकदीची स्पष्टता नाही.
दलित, मुस्लिम समाजाची मते जास्त-
वंचित इंडिया आघाडीत सामील होणार होते. मात्र, आघाडी आणि त्यांच्यात बिनसले. वंचितने अद्याप इथे उमेदवाराची घोषणा केलेली नाही. मात्र, येत्या काही दिवसात उमेदवार घोषित होण्याची शक्यता आहे. एमआयएमची भूमिकाही अजून गुलदस्त्यात आहे. त्यामुळे पाटील आणि कोटेचा या दोघांचेही लक्ष या दोन पक्षांकडे लागले आहे. दलित आणि मुस्लिम समाजाच्या मतांचे प्रमाण लक्षणीय आहे.