कांदिवलीतील रोटी बँक उपक्रम ‘मानवतेचे प्रमुख केंद्र’ बनेल; मुंबईतील पहिल्या वहिल्या उपक्रमाचे लोकार्पण

By मनोहर कुंभेजकर | Published: May 14, 2023 01:54 PM2023-05-14T13:54:23+5:302023-05-14T13:54:46+5:30

कांदिवली पूर्व विधानसभेतील आकुर्ली रोड येथे भाजप नेते व स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या ‘रोटी बँक’ या मुंबईतील पहिल्या वहिल्या उपक्रमाच्या लोकार्पणानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते

The Roti Bank initiative in Kandivali will become a 'major hub of humanity'; Launch of the first initiative in Mumbai | कांदिवलीतील रोटी बँक उपक्रम ‘मानवतेचे प्रमुख केंद्र’ बनेल; मुंबईतील पहिल्या वहिल्या उपक्रमाचे लोकार्पण

कांदिवलीतील रोटी बँक उपक्रम ‘मानवतेचे प्रमुख केंद्र’ बनेल; मुंबईतील पहिल्या वहिल्या उपक्रमाचे लोकार्पण

googlenewsNext

मुंबई : कांदिवली (पूर्व) विधानसभेत निर्माण करण्यात आलेल्या ‘रोटी बँक’ तसेच मोफत ग्रंथालय, पाणपोई, सुशोभिकरण, सार्वजनिक शौचालय अशा विविध प्रकल्पांचे लोकार्पण काल सायंकाळी झाले.

कांदिवली पूर्व विधानसभेतील आकुर्ली रोड येथे भाजप नेते व स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या ‘रोटी बँक’ या मुंबईतील पहिल्या वहिल्या उपक्रमाच्या लोकार्पणानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, रेस्क्यू फाउंडेशनच्या सहसंस्थापक त्रिवेणी आचार्य यांसह मान्यवर उपस्थित होते. ज्यांना आजही दोनवेळचे अन्न मिळत नाही अशा गरजूंसाठी त्यांना सन्मानाने अन्न मिळावे, या हेतूने या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. येणाऱ्या काळात हे केंद्र ‘मानवतेचे एक प्रमुख केंद्र’ बनल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास आमदार अतुल भातखळकर यांनी व्यक्त केला. 

भातखळकर म्हणाले की, जात, पात, धर्म, भाषा यापलिकडे गोरगरिब व्यक्तींची सेवा करणे, मानवतेची सेवा करणे, असे संस्कार आमच्यावर झाले आहेत. स्व. दिनदयाळ उपाध्याय यांनी ‘अंत्योदय’ची कल्पना मांडली. समाजातील शेवटच्या घटकाचा विकास करणे ही आपली आर्थिक निती असायला हवी, या त्यांच्या विचाराच्या आधारावर येणाऱ्या काळात आम्ही जरूर काम करू. ‘रोटी बँक’ हा उपक्रम कांदिवली पूर्वमध्ये अत्यंत प्रभावीपणे राबवण्यात येईल, असेही ते म्हणाले.

यावेळी खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले की, लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना आतापर्यंतच्या २१ वर्षांच्या काळात एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर विविध प्रकल्पांचे लोकार्पण होताना मी पहिल्यांदाच पाहिले आहे. याचा मला अभिमान आहे. कांदिवली पूर्व विधानसभा क्षेत्रात जेव्हा आपण फिरत असतो तेव्हा एक बाब निदर्शनास येते की, प्रत्येक अर्धा किमी अंतरावर आ. भातखळकर यांच्या माध्यमातून झालेले विविध प्रकल्प नजरेस पडतात. आमदार झाल्यानंतर ज्या वेगात त्यांनी काम केले, ते अभिमानास्पद आहे. या रोटी बँकच्या माध्यमातून समाजातील गोरगरिबांची सेवा होणार आहे, याचा मला आनंद आहे. यावेळी त्रिवेणी आचार्य यांचेही भाषण झाले. यावेळी अनुकंपा संस्थेच्या प्रमुखांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. यावेळी गरजूंना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.

Web Title: The Roti Bank initiative in Kandivali will become a 'major hub of humanity'; Launch of the first initiative in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.