Join us

‘नो पार्किंग’मधून दुचाकी उचलताना नियम पाळला जातो का साहेब ? अनेक ठिकाणी वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 10:28 AM

वाहतूक पोलिसांकडूनही वाढला कारवाईचा वेग.

मुंबई : मुंबईत वाहने वाढत आहेत. मात्र, त्या तुलनेत पार्किंग व्यवस्था नसल्याने अनेक वाहनांनी नो पार्किंगमध्ये कोंडी करण्यास सुरुवात केली. त्यानुसार वाहतूक पोलिसांकडूनही कारवाईचा वेग वाढत आहे.

मुंबईत सुमारे ३६ लाख वाहने आहेत. त्या तुलनेत वाहतूक व्यवस्था अपुरी पडत आहे. त्यात मेट्रोच्या कामामुळे या कोंडीत भर पडते. नवीन इमारती, आस्थापनांच्या बांधणीदरम्यान वाहतूक व्यवस्था करणे बंधनकारक आहे. मात्र, आजही बऱ्याच जुन्या इमारतींमध्ये वाहतूक व्यवस्था नसल्याने पर्यायी रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागतात. अशात अवैध पार्किंगविरोधात वाहतूक पोलिसांनी कठोर पावले उचलत नो पार्किंगमधील वाहनांवर कारवाईचा वेग वाढवला आहे. काही ठिकाणी पोलिसांना वादालाही तोंड द्यावे लागले. यात, जागा नसल्याने वाहने पार्क कुठे करायची? असा सवाल काही रहिवासी सोसायट्यांमधील नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला. 

चालकांसाठी महत्त्वाचे...

तुमचे वाहन पोलिसांनी किंवा इतर कोणी टो केले आहे, हे तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही जवळच्या पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा किंवा पोलिस हेल्पलाइन नंबरवर फोनवर संपर्क साधू शकता.

 याआधी तुम्ही तुमचे वाहन जिथे पार्क केले होते, त्या रस्त्यावर काही लिहिलेले आहे का, ते तपासावे. तुम्हाला रस्त्यावर काही लिहिलेले आढळल्यास दिलेल्या तपशिलांवर पोलिसांशी संपर्क साधा. 

तुम्हाला अशा ठिकाणाजवळ ट्रॅफिक पोलिस आढळले, तर तुम्ही त्याला तुमच्या वाहनाबद्दल विचारू शकता. तुमचे वाहन नॉन-पार्किंग झोनमधून आणले गेले आहे, ज्याचा स्पष्ट अर्थ, असा आहे की तुम्ही कायद्याचे पालन केले नाही आणि त्यासाठी तुम्हाला दंड भरावा लागेल. 

या प्रकरणात तुम्हाला नियमानुसार चलन भरावे लागेल. हे वाहनाचे वजन आणि वाहन किती दिवसांसाठी टो केले होते आदी अनेक घटकांवर आधारित असेल. मुंबई वाहतूक पोलिस वेळोवेळी वाहन पार्किंग आणि टोइंगबाबत विविध नियम जारी करतात. ते त्यांच्या वेबसाइटवरही असे नियम प्रकाशित करतात. 

टॅग्स :मुंबई महानगरपालिकापार्किंग