Join us

राज्यातील सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था बिघडवली - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 6:26 AM

षण्मुखानंद सभागृहात आयोजित राष्ट्रवादीच्या रौप्यमहोत्सवी वर्धापन दिन सोहळ्यात बोलताना पवार म्हणाले की, राज्यातीलच नव्हे, तर देशातील शेतकरी आज अस्वस्थ आहे.

मुंबई : राज्यात मागील पाच महिन्यांत ३९१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. ही बाब चिंतेची असून राज्यातील सत्ताधारी पक्षाने शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था बिकट केली आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी केली. 

षण्मुखानंद सभागृहात आयोजित राष्ट्रवादीच्या रौप्यमहोत्सवी वर्धापन दिन सोहळ्यात बोलताना पवार म्हणाले की, राज्यातीलच नव्हे, तर देशातील शेतकरी आज अस्वस्थ आहे. शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. कांदा, कापूस खरेदी दर पडले आहेत.  

कोल्हापूर, संगमनेर, अकोला, अंमळनेर येथे जातीय दंगली झाल्या. महाराष्ट्र हे शांतताप्रिय राज्य आहे. सत्ताधारी पक्षाची शक्ती जेथे नाही, तेथे जातीय तेढ निर्माण करणे आणि राजकीय फायदा उचलण्यासाठी केलेले षड्यंत्र आहे, असा आरोप करत कायदा सुव्यवस्था आबाधित नसेल तर त्याची जबरदस्त किंमत मोजावी लागते, असेही पवार म्हणाले.

दिल्लीचं सरकार धनगर आरक्षण विरोधी - सुळेधनगर आरक्षणाबाबत दिल्लीतील सत्ताधारी सदस्यांची भूमिका विरोधात आहे, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी केला. राज्य सरकार काहीही सांगत असले तरी संसदेत मी जेव्हा धनगर आरक्षणाचा विषय उपस्थित केला तेव्हा सत्ताधारी पक्षाच्या एका खासदाराने या आरक्षणाला आमचा विरोध असल्याचे सांगितले, असा दावा सुळे यांनी केला.

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेस