Join us

Raj Thackeray Letter on Mosque Loud Speakers: सत्ताधारी राज्यकर्त्यांना हिंदूंची ताकद काय आहे, हे दाखवून द्यावे; राज ठाकरेंचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2022 9:26 PM

एका पत्राच्या माध्यमातून राज ठाकरेंनी सर्व हिंदूंना मशिदीवरील भोंग्यांविरुद्ध संघर्ष करण्याचं आवाहन केलं आहे. 

मुंबई: सर्व भोंगे हे अनधिकृत आहेत. भोंगेच कशाला, बहुतांश मशिदीही अनधिकृत आहेत. हे सरकार अनधिकृत मशिदींवरील भोंग्यांना अधिकृत परवानग्या का आणि कशी देते? आणि जर परवानगी देणारच असाल तर आम्हालाही हिंदू देवळांनाही भोंगे लावण्याची परवानगी द्यायलाच हवी. मुळात हा विषय धार्मिक नसून सामाजिक आहे, असं मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी म्हटलं आहे. एका पत्राच्या माध्यमातून राज ठाकरेंनी सर्व हिंदूंना मशिदीवरील भोंग्यांविरुद्ध संघर्ष करण्याचं आवाहन केलं आहे. 

मला पूर्ण कल्पना आहे की, आपल्या देशात असे अनेक मुस्लिम नागरिक आहेत ज्यांना भोंग्यांचा त्रास होतो. पण कर्मठ धर्मगुरूंपुढे, कट्टर धर्मवाद्यांपुढे त्यांना बोलत येत नाही. देशातल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनी भोंग्यांविरोधात काम सुरू करावे. हा विषय एका दिवसात सुटणारा नाही, याचीही मानसिकता ठेवावी. देशातल्या सर्व राज्यकर्त्यांना हे भोंगे बंद पाडण्यास भाग पाडावे. आणि शेवटी एकच सांगतो, प्रत्येक राज्यातल्या नागरिकांनी आपापल्या सत्ताधारी राज्यकर्त्यांना हिंदूंची ताकद काय आहे, हे दाखवून द्यावे, असं आवाहन देखील राज ठाकरेंनी या पत्राद्वारे केलं आहे. 

देशातील सर्वधर्मीयांना ध्वनिक्षेपकांमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाचा त्रास होतो. ही बाब देशातल्या प्रत्येक सरकारला समजलीच पाहिजे. रस्त्यावर नमाजासाठी बसणं आणि वाहतूककोंडी करणं, हे कोणत्या धर्मात बसतं? म्हणूनच आमचे मुस्लिमधर्मियांना एवढंच सांगणे आहे की, हा सामाजिक विषय आहे, हे आधी समजून घ्या. या विषयाला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न केला तर आमच्याकडून त्याचं उत्तर धर्मानच दिलं जाईल, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला आहे.

एकदाचा फैसला होऊन जाऊ दे- राज ठाकरे

महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही आवाहन करतो की, कै. हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी कित्येक वर्षांपूर्वी सर्व भोंगे बंद झालेच पाहिजेत" हे सांगितलेलं आपण ऐकणार आहात; की तुम्हाला सत्तेवर बसवणाऱ्या बेगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवार साहेब यांचे ऐकणार आहात? याचा फैसला महाराष्ट्रातील जनतेसमोर एकदाचा होऊन जाऊ दे, असं म्हणत राज यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कोंडीत पकडलं आहे.

देशात इतकी कारागृहं नाहीत की...- राज ठाकरे

देशात इतकी कारागृहं नाहीत की देशातल्या तमाम हिंदूंना कारागृहात डांबणे सरकारला शक्य होईल! हेसुद्धा सर्व सरकारांनी लक्षात घ्यावे. माझ्या हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, भोंगे हटवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांची बंधनं झुगारून एकत्र या. आता नाही, तर कधीच नाही, असं राज यांनी पत्रात म्हटलं आहे.

टॅग्स :राज ठाकरेमनसे