दाऊदी बोहरा समाजाचे सय्यदना हेच उत्तराधिकारी; पुतण्याचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 07:48 AM2024-04-24T07:48:14+5:302024-04-24T07:48:54+5:30
२०१६ मध्ये कुतबुद्दीन यांच्या निधनानंतर मुलगा ताहेर फखरूद्दीन यांनी वडिलांची लढाई सुरूच ठेवली.
मुंबई : दाऊदी बोहरा समाजाचे नेते म्हणून सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांचे पद आणि नियुक्तीला आव्हान देणारा दावा उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळला. हा दावा त्यांचे पुतणे ताहेर फखरुद्दीन यांनी २०१४ मध्ये दाखल केला होता.
न्यायालयाने पुराव्यांच्या आधारे निर्णय घेतला, आस्थेच्या आधारावर नाही, असे न्या. गौतम पटेल यांच्या एकल पीठाने म्हटले. जानेवारी २०१४ मध्ये ५२ वे सय्यदना मोहम्मद बुरहानुद्दीन यांच्या मृत्यूनंतर त्यांचे भाऊ खुझैमा कुतबुद्दीन यांनी हा दावा दाखल केला. बुरहानुद्दीन यांचा दुसरा मुलगा मुफद्दल सैफुद्दीन यांनी सय्यदना पद घेताच ते बोहरा समाजाचे ५३ वे धार्मिक नेते ठरले. त्यांच्या नियुक्तीला कुतबुद्दीन यांनी आव्हान दिले. २०१६ मध्ये कुतबुद्दीन यांच्या निधनानंतर मुलगा ताहेर फखरूद्दीन यांनी वडिलांची लढाई सुरूच ठेवली. कुतबुद्दीन यांनी दाव्यात म्हटले की, भाऊ बुरहानुद्दीन यांनी कुतबुद्दीन यांची ‘माजून’ म्हणून नियुक्ती करून उत्तराधिकारी ठरविले होते तर फखरूद्दीन यांनी वडिलांनी मृत्यूपूर्वीच त्यांचे उत्तराधिकारी म्हणून घोषित केल्याचे न्यायालयाला सांगितले.
उत्तराधिकारी दैवी प्रेरणेने नेमला जातो
दाऊदी बोहरा हा शिया मुस्लिमांमधील धार्मिक संप्रदाय आहे. व्यापार व उद्योजक असलेला बोहरा समाजाची भारतात पाच लाखांहून अधिक लोकसंख्या आहे. संपूर्ण जगात १० लाख लोक आहेत. समुदायाचा सर्वोच्च धार्मिक नेता ‘दाई-अल-मुतलक’ (सर्वांत ज्येष्ठ) म्हणून ओळखला जातो. समाजाची आस्था व सिद्धांतानुसार त्यांचा उत्तराधिकारी दैवी प्रेरणेने नेमला जातो.