शाळेनेच खाल्ले विद्यार्थ्यांचे २९ हजार किलो धान्य; चेंबूरच्या स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘मिड डे मिल’ घोटाळा
By मनीषा म्हात्रे | Published: March 6, 2024 02:09 PM2024-03-06T14:09:50+5:302024-03-06T14:10:35+5:30
शिक्षण विभागाने नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालातून २९ हजार किलो हरभरा, मसूर डाळीत अफरातफर उघड होऊनही कारवाईसाठी मुहूर्त मिळालेला नाही.
मुंबई : चेंबूरच्या स्वामी विवेकानंद हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज सिंधी सोसायटी या अनुदानित शाळेत कोरोनाच्या काळात मिड डे मिल घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिक्षण विभागाने नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालातून २९ हजार किलो हरभरा, मसूर डाळीत अफरातफर उघड होऊनही कारवाईसाठी मुहूर्त मिळालेला नाही.
गेल्या महिन्याभरापासून शाळेच्या मुख्याध्यापिकेवर कारवाई करण्याबाबतचा अहवाल मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे धूळखात पडून आहे. मुलुंडचे भारत ठक्कर यांच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार समोर आला. चेंबूरच्या विवेकानंद एज्युकेशन सोसायटी संचलित शाळेत सिंधी सोसायटी, कलेक्टर कॉलनी आणि ठक्कर बाप्पा कॉलनी या तीन ठिकाणी तुकड्या भरवल्या जातात. शाळेत पाचवी ते आठवीच्या मध्यान्ह भोजनासाठी पात्र विद्यार्थ्यांमध्ये २०२०-२१ मध्ये १,७३४, तर २०२१-२२ मध्ये एकूण १,७८४ विद्यार्थ्यांचा समावेश होता. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांसाठी मसूर डाळ व हरभरा यांच्या प्रत्येकी १२८ गोण्या शाळेला देण्यात आल्या.
ठक्कर यांनी माहिती अधिकारात मिळवलेल्या कागदपत्रांच्या आधारे २१ नोव्हेंबर २०२३ मध्ये शिक्षण विभागाकडे तक्रार केली. उत्तर विभागाचे शिक्षण निरीक्षक डॉ. मुश्ताक शेख यांच्या नेतृत्वात चौकशी समिती स्थापन केली. शाळेने शिक्षण विभागाला दिलेल्या माहितीत, ६८९ विद्यार्थ्यांना ६,९६२ किलो धान्यवाटप केले. मात्र, प्रत्यक्षात पात्र विद्यार्थ्यांना धान्य पुरवठा न करता, नववी आणि दहावीच्या ३२५ विद्यार्थ्यांना काही धान्य वाटप केल्याचे समोर आले.
शाळेच्या म्हणण्यानुसार, जून २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत धान्य खराब झाल्याने त्याची विल्हेवाट लावण्यात आली. मात्र, या भागात पाणी साचल्याचे आढळून आले नाही. तसेच पावसाच्या पाण्यामुळे शाळेचे अभिलेख भिजल्याची नोंद नाही. मुख्याध्यापकांनी नुकसान झालेल्या अन्नधान्याची विल्हेवाट लावल्याबाबतचा नियमबाह्य पंचनामा सादर केला. पंचनाम्यामध्ये नुकसान झालेल्या अन्नधान्याची विल्हेवाट लावलेल्या ठिकाणाचा तसेच वापरलेल्या वाहन, चालकाचा तपशील नाही. त्यामुळे पंचनामा बनावट असल्याचा ठपकाही चौकशी अहवालात ठेवण्यात आला आहे.
कुठल्या वर्गासाठी, किती धान्य?
पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी मसूर डाळ २,७४८ किलो, हरभरा २,७४८ किलो तसेच ६वी ते ८वीसाठी मसूर डाळ ११,८०८ किलो व हरभरा ११,८०८ किलोग्रॅम देण्यात आले होते.
या तुकड्यांना मान्यता नाही
शाळेच्या चेंबूरमधील कलेक्टर कॉलनी, ठक्कर बप्पा कॉलनीतील तुकड्यांना शिक्षण विभागाची मान्यता घेतली नसल्याचेही समोर आले.
कारवाईसाठी
मुहूर्त मिळेना
चौकशीअंती शिक्षण निरीक्षक डॉ. मुश्ताक शेख यांनी शाळेचे मुख्याध्यापक राधा नारायण यांनी धान्य वाटपात अफरातफर करून फसवणूक केल्याचा ठपका ठेवला आहे.
शाळेच्या मुख्याध्यापिकेविरुद्ध कायदेशीर कारवाईसाठी परवानगी मिळण्याबाबत मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे ७ फेब्रुवारी रोजी उत्तर विभागाचे शिक्षण निरीक्षक यांनी पत्राद्वारे मागणी केली आहे.
मात्र अद्याप त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे.