Join us

पोयसर नदीत वाहून गेलेल्या मुलाचा शोध अजून सुरूच

By मनोहर कुंभेजकर | Published: July 20, 2023 5:56 PM

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून वाहणाऱ्या पोयसर नदीला पूर आल्याने यात क्रांतीनगर येथील २५ वर्षाचा तरुण वाहून गेला.

मुंबई - काल झालेल्या मुसळधार पावसात पश्चिम उपनगरातील नद्यांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून वाहणाऱ्या पोयसर नदीला पूर आल्याने यात क्रांतीनगर येथील २५ वर्षाचा तरुण वाहून गेला. त्यामुळे महापालिका व राज्य शासनाने शोध मोहीम हाती घेवून या तरुणाला शोधून काढावे अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विधी मंडळ मुख्य प्रतोद,आमदार सुनील प्रभू यांनी केली आहे.

दिंडोशी विधानसभा  क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ३९ येथील क्रांतीनगर राजीव गांधी शाळेच्या वरती वन विभागातून वाहणाऱ्या पोयसर नदीत चंदन (घोडेलाल) दिलीप सहा (वय २५) वर्ष राजीव गांधी चाळ, क्रांतीनगर, आकुर्ली रोड कांदिवली (पूर्व) हा तरुण पावसाच्या पाण्यामुळे काल वाहून गेला होता. काल दुपारपासून अजून पर्यंत त्याची शोधमोहिम सुरुच आहे.

स्थानिक आमदार सुनील प्रभू यांनी शिवसैनिकांना शोध मोहिम घेण्यासाठी घटनास्थळी पाचारण केले असून काल रात्री ९.३० पर्यंत आणि आज दिवसभर आम्ही या मुलाचा शोध घेत असल्याचे येथील शाखाप्रमुख शाखाप्रमुख रमेश कळंबे यांनी सांगितले. सदर तरुण संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून वाहणाऱ्या पोयसर नदीत उतरला होता.त्याला वाचवण्याचा दुसऱ्या तरुणाने प्रयत्न केला, मात्र तो निसटून पाण्याचा प्रवाह जोऱ्यात असल्याने हा तरुण वाहून गेला अशी माहिती त्यांनी दिली.

तर याप्रकरणी कुरार पोलिसांनी देखिल मोठे सहकार्य केले असून स्वतः येथील वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश गाढवे आणि पोलिस निरीक्षक जाधव येथे जातीने हजर होते.पोलिस हवालदार राजू जाधव , शांताराम गोमासे ,रियाज काजी, महेश गायकावाड ,प्रशांत बागल तसेच विभागातील कार्यकर्ते विनायक काळे, युषुप पठान , सुरेंद्रकुमार रायँ ,दीपक जैस्वाल बाबू फिंटिंग आणि शिवसैनिक सदर इसमाचा काल पासून शोध घेत असल्याचे कळंबे म्हणाले.

टॅग्स :मुंबई