विसर्जनस्थळाचा शोध आता पालिकेच्या चॅटबॉटवरून; घरबसल्या नोंदणी करा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 07:25 AM2023-09-21T07:25:24+5:302023-09-21T07:26:03+5:30
पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरही गणेशभक्तांना काही माहितीपूर्ण सुविधा दिल्या आहेत.
मुंबई - मुंबईतील नागरिक आणि विशेषतः पर्यटकांसाठी आपल्या परिसरातील जवळचे विसर्जन स्थान शोधणे आता आणखी सोपे होणार असून यासाठी पालिका मदत करणार आहे. आपल्या परिसरातील मूर्ती विसर्जनस्थान शोधण्याची सुविधा पालिका प्रशासनाने व्हॉट्सॲप चॅटबॉट आणि पालिकेचे संकेतस्थळ या दोन्ही माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे.
एवढेच नव्हे तर गणेशमूर्ती विसर्जनासाठी पालिकेच्या संकेतस्थळावरून आपल्या पसंतीचे ठिकाण व वेळ देखील नोंदण्याची ऑनलाइन सुविधा पालिकेकडून यंदा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गणेशोत्सवाचा आनंद घेणे नागरिकांना व पर्यटकांना अधिक सोपे व्हावे, यासाठी त्यांना आपल्या नजीकचे गणेश मंडळ शोधता यावे, तेथे पोहोचणे सोपे व्हावे यासाठीही पालिकेने व्हॉट्सॲप चॅटबॉट आणि संकेतस्थळ या दोन्ही ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
या सुविधेमुळे गणेशभक्तांना आपल्या नजीकचे व आवडीचे गणेश मंडळ, त्याचप्रमाणे भाविकांना विसर्जन स्थळांची माहिती मिळवणे, विसर्जनाचे ठिकाण व वेळ यांची ऑनलाइन नोंद करणे, इत्यादी सुविधांची माहिती घरबसल्या होणार आहे, अशी माहिती गणेशोत्सवाचे समन्वयक व उपायुक्त रमाकांत बिरादार आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक शरद उघडे यांनी दिली आहे.
विविध सुविधांचे मार्गदर्शन उपलब्ध
पालिकेची माय बीएमसी व्हॉट्सॲप चॅटबॉट सुविधा ८९९९२२८९९९ या क्रमांकावर उपलब्ध आहे. या क्रमांकाद्वारे मुंबईकरांना पालिकेच्या विविध नागरी सेवा-सुविधा कशा प्राप्त कराव्यात, याचे मार्गदर्शन करण्यात येते.
नैसर्गिक व कृत्रिम तलावांची माहिती मिळणार
पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरही गणेशभक्तांना काही माहितीपूर्ण सुविधा दिल्या आहेत. यात आपण संबंधित गणेश मंडळाच्या स्थानापर्यंत पोहोचणे, मूर्ती विसर्जन स्थळापर्यंत जाण्यासाठी दिशा निर्देश, सार्वजनिक वाहतुकीची साधने, रहदारीसाठी लागणारा वेळ आदी माहिती तसेच विसर्जन स्थान हे कृत्रिम की नैसर्गिक आहे, तेही यातून समजणार आहे.