Join us

‘इंडिया’चा जागावाटप फाॅर्म्युला ठरला, ‘लोकमत’च्या वृत्तावर शिक्कामोर्तब; राज्याराज्यातील प्रभावानुसार हाेणार जागावाटप चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2023 6:41 AM

बैठकीत इंडिया आघाडीची समन्वय समिती स्थापन करण्याबरोबरच जागा वाटप, निवडणुकीचा प्रचार-प्रसार, सभा, शिबिरे यासाठी विविध समित्याही स्थापन करण्यात आल्या.

- दीपक भातुसे / मनोज मोघे

मुंबई : ‘जुडेगा इंडिया, जितेगा भारत’ या घोषवाक्याखाली एकत्र आलेल्या विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्यामुंबईतील बैठकीत शुक्रवारी लोकसभा निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने एकत्रित लढण्याचा निर्धार करत अनेक मुद्दे मार्गी लावण्यात आले. बैठकीत जागा वाटपाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली असून जागा वाटपाचा फॉर्म्युला देखील निश्चित करण्यात आला आहे. बैठकीत इंडिया आघाडीची समन्वय समिती स्थापन करण्याबरोबरच जागा वाटप, निवडणुकीचा प्रचार-प्रसार, सभा, शिबिरे यासाठी विविध समित्याही स्थापन करण्यात आल्या.

देशातील प्रत्येक राज्यात वेगवेगळे पक्ष आणि वेगवेगळे प्रश्न असल्याने जागा वाटपाची चर्चा प्रत्येक राज्यस्तरावर करण्याबाबत या बैठकीत एकमत झाले आहे. त्यानुसार लवकरच राज्यस्तरावर जागा वाटपाची चर्चा सुरू करून अंतिम जागा वाटप निश्चित केले जाणार आहे. आघाडीने नियुक्त केलेली समन्वय समिती या जागा वाटपावर लक्ष ठेवणार आहे. जागा वाटपाबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी नाराज असल्याची चर्चा असून त्यांची नाराजीही लवकरच दूर होईल, असे इंडिया आघाडीतील नेत्यांचा दावा आहे.

इंडिया आघाडीच्या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी २८ पक्षांच्या प्रतिनिधींची एकत्रित बैठक पार पडली. लोकसभा निवडणुका वेळेपूर्वी होण्याच्या शक्यतेवर चर्चा होऊन त्यादृष्टीने जागा वाटप लवकर निश्चित करण्यावर एकमत झाले. 

वेळ कमी, लवकर ठरवाबैठकीपूर्वी लोकसभा निवडणूक वेळेआधी होण्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे इंडिया आघाडीने जागा वाटपाची चर्चा लवकर संपवली नाही तर प्रचारासाठी वेळ मिळणार नाही, ही बाब लक्षात घेता जागा वाटप हा या बैठकीत कळीचा मुद्दा होता. त्यामुळेच जागा वाटपाची चर्चा राज्यनिहाय करून ती लवकरच संपवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

समित्यांवर खल - समन्वय समितीमध्ये प्रमुख पक्षांच्या नेत्यांचा समावेश करणे आवश्यक असल्याने या समितीत २८ पैकी १४ पक्षांच्या नेत्यांना स्थान देण्यात आले आहे. - ज्या पक्षांना समन्वय समितीमध्ये स्थान मिळालेले नाही त्या पक्षांना इतर समित्यांमध्ये सामावून घेण्यात आले आहे. प्रचार समितीत १६ जणांचा समावेश आहे.

‘इंडिया’चे तीन ठरावआम्ही इंडिया आघाडीतील सर्व पक्ष आगामी लोकसभा निवडणुका एकत्र लढण्याचा संकल्प करतो. विविध राज्यांमध्ये जागावाटपाची प्रक्रिया सुरू केली जाईल आणि ती शक्य तितक्या लवकर पूर्ण केली जाईल.आम्ही, आघाडीतील सर्व पक्ष, लोकांच्या समस्या आणि त्यांच्याशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यावर लवकरात लवकर देशाच्या विविध भागात सार्वजनिक सभा आयोजित करण्याचा संकल्प करतो.आघाडीतील सर्व पक्ष “जुडेगा भारत, जीतेगा भारत” या ब्रीदवाक्यासह आमची सर्व मीडिया धोरणे आणि मोहिमांमध्ये समन्वय राखण्याचा संकल्प करतो.

(इंडिया आघाडीचे जागावाटप राज्यनिहाय होणार हे वृत्त लोकमतने गुरुवारीच दिले होते.)- मुंबईत आज ‘इंडिया’, लोकसभेची रणनीती ठरणार

टॅग्स :इंडिया आघाडीमुंबई