लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरावर सलग दुसऱ्या दिवशी आयकर विभागाची झाडाझडती सुरू आहे. दुसरीकडे शनिवारी सकाळी कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान, जाधव कुटुंबीयांनी खिडकीत येऊन, कार्यकर्त्यांना आम्ही सुरक्षित असून, सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले.
शुक्रवारी सकाळी ७ वाजल्यापासून आयकर विभागाकडून कर चुकवेगिरीप्रकरणी यशवंत जाधव आणि आमदार यामिनी जाधव यांच्या घरात झाडाझडती करत चौकशी सुरू आहे. रात्रीही पथकाने त्यांच्या घरातच मुक्काम केला. यादरम्यान जाधव कुटुंबीयांना घेऊन पथक जाणार असल्याची माहिती परिसरात पसरली आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताडवाडी येथील घराबाहेर गर्दी करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवून गर्दीवर नियंत्रण आणले. त्यापाठोपाठ शनिवारी सकाळी देखील कार्यकर्त्यांनी परिसरात रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच, जाधव कुटुंबीयांनी खिडकीतून कार्यकर्त्यांना आवाहन करण्यास सांगितले. यावेळी यामिनी जाधव यांनी, ‘आंदोलन करू नका. आम्ही जाधव कुटुंबीय सुरक्षित आहोत. तुम्ही आमच्यासोबत आहात, आम्हाला काहीही होणार नाही’ असे सांगत कार्यकर्त्यांना घरी जाण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतर हळूहळू कार्यकर्ते मागे फिरले. मुंबईत अन्य ठिकाणीही आयकर विभागाकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे.