दुसऱ्या महाकाय गर्डरची उद्या जोडणी; अंबाला-न्हावा-वरळी प्रवास होणार जलद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 09:51 AM2024-05-13T09:51:31+5:302024-05-13T09:52:41+5:30
मुंबई किनारी (कोस्टल) मार्गावरून वांद्रे-वरळी सागरी सेतूकडे जाणाऱ्या मार्गाची दुसरी महाकाय तुळई (गर्डर) अंबाला (हरयाणा) येथून मुंबईत दाखल झाली आहे.
मुंबई :मुंबई किनारी (कोस्टल) मार्गावरून वांद्रे-वरळी सागरी सेतूकडे जाणाऱ्या मार्गाची दुसरी महाकाय तुळई (गर्डर) अंबाला (हरयाणा) येथून मुंबईत दाखल झाली आहे. ही तुळई मंगळवारी पहाटे समुद्राच्या लाटांचा अंदाज घेत बसवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या आव्हानात्मक मोहिमेसाठी साधारणपणे तीन ते चार तासांचा कालावधी लागण्याची शक्यता असून, यासाठी पालिका प्रशासन आणि तांत्रिक पथक सज्ज झाले आहे. ही तुळई बसवल्यानंतर मुंबईच्या दक्षिण टोकापासून म्हणजेच नरिमन पॉइंटपासून वरळी-वांद्रे सागरी सेतूपर्यंत वेगाने पोहोचण्यास मदत होणार आहे.
मुंबई किनारी रस्ता प्रकल्प एकूण १०.५८ किलोमीटर लांबीचा आहे. किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाची सांधणी हा त्यातील अतिशय आव्हानात्मक टप्पा आहे.
या मार्गातील पहिली दोन हजार मेट्रिक टन वजनाची महाकाय तुळई बसवण्याचे काम पालिकेने आधीच यशस्वीपणे पूर्ण केले आहे. आता दुसरी तुळई बसवण्याचे काम पूर्ण करून किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू पूर्णपणे जोडला जाणार आहे.
तुळईला गंजविरोधक रंगकाम -
१) वरळी येथील क्लिव्हलँड जेट्टीमधून मच्छीमारांच्या नौकानयन मार्गात व्यत्यय येणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली आहे.
२) यासाठी मोजक्याच सुट्या भागांचे (प्री-फॅब्रिकेटेड) पुलाचे नियोजन व बांधकाम करण्यात आले आहे.
३) ही बांधकाम प्रणाली अवलंबत समुद्र व पर्यावरण घटकांना कमीत कमी अडथळा निर्माण होईल, याची काळजी घेण्यात आली आहे.
४) या पुलाला समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून व दमट वातावरणापासून सुरक्षित ठेवण्यासाठी सी-५ गुणवत्ता असलेले गंजविरोधक रंगकाम केले आहे.
अंबाला-न्हावा-वरळी असा प्रवास-
पहिल्या तुळईप्रमाणे दुसऱ्या तुळईचे छोटे छोटे सुटे भाग अंबाला (हरयाणा) येथे तयार करण्यात आले आहेत. तेथून ट्रेलरवरून हे सुटे भाग दाखल आले आहेत. ते एकत्र जोडून नवी मुंबईतील न्हावा बंदरातून तराफाच्या मदतीने ही तुळई वरळी येथे आणण्यात आली आहे. ही तुळई दोन हजार ४०० मेट्रिक टन वजनाची आहे. तसेच १४३ मीटर लांब आणि २६ ते २९ मीटर रुंद आहे.
पहिली तुळई दोन हजार टनांची-
पहिली तुळई वरळीकडून नरिमन पाॅइंट दिशेला जाणाऱ्या मार्गावर बसवण्यात आली असून, ती दोन हजार मेट्रिक टन वजनाची आहे. तसेच १३६ मीटर लांब आणि १८ ते २१ मीटर रुंद असून जॅकचा वापर करून स्थापन करण्यात आली आहे.