मुंबईतील महत्त्वाच्या रस्त्यांची दुसऱ्या टप्प्यातील कामे आता विधानसभा निवडणुकीनंतर!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 02:34 PM2024-10-22T14:34:49+5:302024-10-22T14:36:25+5:30
वाहतूक पोलिसांकडून एनओसी मिळविण्यास विलंब
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबईतील रस्त्यांच्या सिमेंट-काँक्रीटीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांना अद्याप वाहतूक पोलिस विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे संबंधित कामे निवडणुकीनंतरच सुरू होणार आहेत. ऑक्टोबरपासून या कामांना सुरुवात होणार होती.
रस्ते काँक्रीटीकरणात भूमिगत सेवा वाहिन्यांचा अडथळा होऊ नये याकरिता पालिकेच्या विविध विभागांकडून या प्राधिकरणांशी चर्चा सुरू आहेत. आतापर्यंत महानगर, अदानी इलेक्ट्रिसिटी अशा प्राधिकरणांशी चर्चा झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या सूचनेनुसार एकदा रस्ते विकास झाला की, त्या रस्त्यावर खोदकाम किंवा चर खोदण्यास परवानगी देता येणार नाही. त्यामुळे प्राधिकरणांशी चर्चा सुरू आहेत.
हरकत प्रमाणपत्र
जानेवारी २०२३ मध्ये पहिल्या टप्प्यात ३९२ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या कामांसाठी कार्यादेश देण्यात आले होते.
दुसऱ्या टप्प्यात ३०९ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. एकूण ७०१ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी कार्यादेश जारी करण्यात आले आहेत. वाहतूक विभाग पोलिसांकडून ना-हरकत प्रमाणपत्राअभावी या कामांना सुरुवात झालेली नाही. येत्या २ दिवसांत बैठक होणार असून, ना-हरकत प्रमाणपत्र लवकरच मिळेल.
रस्ता, खोदण्याची वेळ येऊ नये
तयार झालेला रस्ता पुन्हा खोदण्याची वेळ येऊ नये म्हणून महानगरपालिकेच्या जलअभियंता विभाग, पर्जन्य जलवाहिन्या विभाग, पाणीपुरवठा प्रकल्प, मलनिस्सारण प्रचालन, मलनिस्सारण प्रकल्प आदी विविध विभागांशी समन्वय ठेवून रस्त्यांची कामे पूर्ण केली जाणार आहेत.
त्याचबरोबर विद्युत कंपन्या, गॅस वितरण कंपन्या, दूरध्वनी कंपन्या यांच्याशी संपर्क साधून, महापालिकेने रस्ते विकासाबाबत हाती घेतलेल्या कार्यक्रमाची माहिती त्यांना दिली जात आहे. या रस्त्यावर काही कामे असतील तर ती आणि रस्ते विकासाची कामे यांचा मेळ घालूनच पुढील कामे केली जाणार आहेत.