रिअल इस्टेट एजंटसची दुसरी परीक्षा ६ ऑगस्टला होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2023 02:16 PM2023-07-28T14:16:24+5:302023-07-28T14:16:35+5:30
ऑनलाईन होणाऱ्या या परीक्षेत पंढरपूर, लातूर, जळगाव, धुळे, अहमदनगर या भागांतीलही एजंटस होणार सहभागी
मुंबई : स्थावर संपदा क्षेत्रातील आणखी 3137 एजंटस अपेक्षित प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण करून 6 ऑगस्ट रोजी राज्यात होणाऱ्या परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. यात पंढरपूर, लातूर,जळगाव, धुळे, अमरावती, अकोला, अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, सांगली , सातारा , सोलापूर सह पुणे ,मुंबई महानगरातील एजंटस सहभागी होणार आहेत. 20 मे रोजी झालेली पहिली परीक्षा 423 एजंटसनी दिली होती. यापैकी 405 एजंटस उत्तीर्ण झालेले आहेत.
राज्यात सुमारे 39 हजार स्थावर संपदा एजंटस कार्यरत असून त्यांना 1 सप्टेंबर पूर्वी प्रशिक्षण पूर्ण करून परीक्षा देऊन प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे . ही बाब महारेराने 10 जानेवारीला एका परिपत्रकाद्वारे जाहीर केलेली आहे. या सर्वांनी प्रमाणपत्र प्राप्त केले नाहीतर १ सप्टेंबर नंतर त्यांना एजंट म्हणून काम करता येणार नाही, असे महाराराने पुन्हा स्पष्ट केले आहे. स्थावर संपदा क्षेत्रातील 'एजंट' हा घर खरेदीदार आणि विकासक यांच्यातील अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे.
बहुतेकवेळा ग्राहक पहिल्यांदा एजंटसच्याच संपर्कात येतात. ग्राहकांना प्रकल्पाच्या अनुषंगाने प्राथमिक माहिती त्यांच्याकडूनच मिळते. एजंटसचे हे महत्त्व लक्षात घेऊन या क्षेत्रात कार्यरत सर्व एजंटसना रेरा कायद्यातील महत्वाच्या तरतुदी माहीत असायला हव्यात. त्यांच्याकडून ग्राहकाला आदर्श विक्री करार( Agreement for Sale), घर नोंदणी केल्यानंतर दिले जाणारे नोंदणी पत्र ( Allotment letter) चटई क्षेत्र, दोष दायित्व कालावधी अशासारख्या विनियामक तरतुदींची प्राथमिक माहिती देताना त्यात समानता, सातत्य आणि स्पष्टता असायला हवी. या माहितीच्या आधारेच ग्राहक घरखरेदीचा निर्णय घेतात. म्हणून ग्राहकहित डोळ्यासमोर ठेवूनच महारेराने हे प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र बंधनकारक केलेले आहे.