Join us

पालिकेच्या आस्थापनांतील सुरक्षा दल होणार सक्षम, चार रुग्णालयांत पालिका वापरणार कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2024 10:25 AM

महानगरपालिकेच्या आस्थापनांना सेवा देणाऱ्या सुरक्षा दलाचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बळकटीकरण केले जाणार आहे.

मुंबई : महानगरपालिकेच्या आस्थापनांना सेवा देणाऱ्या सुरक्षा दलाचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बळकटीकरण केले जाणार आहे. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) या  प्रणालीच्या वापर केला जाणार आहे. त्याचबरोबर पालिका रुग्णालयांच्या सुरक्षेसाठीही कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली वापरली जाणार आहे. त्यामुळे पालिकेच्या आस्थापनांतील सुरक्षा दल सक्षम होण्यास मदत मिळणार आहे. के.ई.एम., सायनचे लोकमान्य टिळक रुग्णालय, नायर रुग्णालय, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रु. न. कुपर रुग्णालय या प्रमुख चार रुग्णालयांत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा) वापर करण्यात आला आहे. रुग्णालयाच्या परिसरात येणाऱ्या वाहनांसाठी, तसेच रुग्णांसाठी वापरल्या जाणाऱ्या कॅमेऱ्यांमुळे रुग्णालयातील नातेवाइकांचे साहित्य व मोबाइलच्या चोरीची प्रकरणे कमी झाली आहेत.

 रुग्णालयाच्या परिसरातील जमाव, आग यांसारख्या दुर्घटनांची माहिती नियंत्रण कक्षालाही या कॅमेऱ्याच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याची सुविधा आहे. तसेच अग्निशमन दलालाही या कॅमेऱ्याचा वापर करून सतर्क करणे शक्य आहे. सहायक सुरक्षा अधिकारी आणि सुरक्षारक्षक या पदांची भरतीची प्रक्रिया महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. सहायक सुरक्षा अधिकारी (६५ पदे) आणि सुरक्षा अधिकारी (१४०० पदे) आदी रिक्त जागांसाठी लवकरच भरती प्रक्रिया राबविण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली.

सुरक्षा दलात लवकरच भरती :

१) सुरक्षा दलाचे बळकटीकरण करण्यासाठी ई-बटवडा प्रणालीचा वापर केला जाणार आहे. प्रत्येक सुरक्षा रक्षकाच्या मोबाइलमध्ये ई-बटवडा या मोबाइल ॲपचा वापर येत्या पंधरवड्यात सुरू होणार आहे.

२) या ॲपचा वापर प्रत्येक सुरक्षा रक्षकाला आपल्या कामाचे ठिकाण कळण्यासाठी, तसेच उपस्थिती लावण्यासाठी होणार आहे. या ॲप्लिकेशनमध्ये जिओ फेन्सिंगचा वापर करण्यात आला आहे. त्यासोबतच एखादा मोर्चा किंवा जमाव याबाबतची माहिती देण्यासाठी ॲपचा वापर करता येईल. 

कीटकनाशक संयंत्रे : घनकचरा विभाग, तसेच पर्जन्य जलवाहिन्या विभाग यांसारख्या विभागांमध्ये अनेकदा सुरक्षा कर्मचारीवर्गाला डासांचा उपद्रव सहन करावा लागतो. त्यामुळे पालिकेच्या विविध विभागांच्या क्षेत्रात जवळपास ७०० चौक्यांच्या ठिकाणी कीटकनाशक संयंत्रे लावण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात ३५ संयंत्रे  सुरक्षा रक्षकांच्या विविध चौक्यांमध्ये लावण्यात येणार असल्याची माहिती प्रमुख सुरक्षा अधिकारी  अजित तावडे यांनी दिली.

टॅग्स :मुंबईनगर पालिका