Join us  

भरधाव कारने दिली धडक, सुरक्षारक्षकाचा हात मोडला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 1:14 PM

तक्रारदार महेंद्र मिस्त्री (वय ४३) हे क्रिस्टल सिक्युरिटी कंपनीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करतात.

मुंबई : विमानतळ परिसरात असलेली अनधिकृत पार्किंग हटवण्याची जबाबदारी असलेल्या सुरक्षारक्षकाला एका कारने जोरदार धडक दिली. त्यात संबंधित व्यक्तीचा हात मोडला असून, चालकावर सहार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार महेंद्र मिस्त्री (वय ४३) हे क्रिस्टल सिक्युरिटी कंपनीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. संबंधित कंपनी ही छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरामध्ये सुरक्षा पुरवण्याचे काम करते. २३ मार्च रोजी रात्री सव्वाबाराच्या सुमारास त्यांना नौपाडा परिसरातील लीला गॅलरी प्लॉट येथील सुरक्षा व्यवस्था पाहण्याचे  काम सोपवण्यात आले होते.

दरम्यान, विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या मारुती मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत पार्किंग असल्याने ती हटवण्याचे काम ते करत होते. त्याचवेळी एक पांढऱ्या रंगाची इनोवा कार अंधेरी-कुर्ला रोडवरून पार्किंग करण्यासाठी येऊ लागली. ते मिस्त्री यांनी पाहिल्यावर त्यांनी चालकाला पार्किंग न करण्याकरिता हातवारे करत ओरडण्यास सुरुवात केली. मात्र त्याने मिस्त्रींचे काहीच न ऐकता गाडी त्यांच्या दिशेने भरधाव वेगाने नेली आणि त्याची जोरदार धडक त्यांना बसली. 

कूपर रुग्णालयात केले दाखल  या अपघातात मिस्त्री खाली पडले व यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना कूपर रुग्णालयात हलवण्यात आले.   तेव्हा डॉक्टरने त्यांच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याचे निदान केले. उपचारानंतर मिस्त्री यांनी सहार पोलिस ठाणे गाठत सदर वाहन चालकाविरोधात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :अपघात