मुंबई : डॉक्टरांवर नातेवाइकांनी केलेल्या हल्ल्याच्या घटना वाढल्यानंतर त्यांना संरक्षण मिळावे, म्हणून वैद्यकीय शिक्षण विभागाने महाराष्ट्र सुरक्षा महामंडळ यांच्याकडून १४ वैद्यकीय महाविद्यलयांसाठी सुरक्षारक्षक सेवा घेतली होती. त्यांच्या वेतनात तीन हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सध्याच्या घडीला १४ महाविद्यालयांत १०८८ सुरक्षारक्षक सेवा देत आहेत. त्यामुळे आता महिन्याला ३२ लाख ६४ हजारांचा अतिरिक्त बोजा सरकारी तिजोरीवर पडणार आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालये संलग्नित रुग्णलयांतील डॉक्टरवर वारंवार होणारे हल्ले व नातेवाइकांकडून रुग्णालयाची होणारी तोडफोड त्याअनुषंगाने २०१५ साली मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात उच्च न्यायालयाने डॉक्टरांच्या सुरक्षेकरिता उपाययोजना करण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार २०१७ साली १४ शासकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये एकूण १०८८ सुरक्षा रक्षक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाने २०१८ साली जी बैठक झाली २०१९ पासून ३००० प्रतिमाह (सर्व पदांकरिता) वाढविले असल्याने सुधारित दर आकारण्यात येणार असल्याचे विभागाला कळविले होते. या महामंडळाने कळविलेल्या माहितीच्या अनुषंगाने ३००० वाढीव दरानुसार देय असलेले मानधन देण्याचा विभागाने निर्णय घेतला आहे.
म्हणून नेमले सुरक्षा रक्षक...
शासकीय रुग्णालयात अनेक वेळा निवासी डॉक्टरांना मारहाण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. काही वेळा नातेवाईक त्यांचा रुग्ण दगावल्याचा राग हे निवासी डॉक्टरांवर काढत असल्याच्या घटना काही वर्षांपूर्वी वाढीस लागल्या होत्या. त्या घटनांना आळा घालण्याकरिता सरकाने त्यावेळी १४ वैद्यकीय महाविद्यलयांत अतिरिक्त सुरक्षा रक्षक रुग्णालयात नेमण्याचा निर्णय घेतला होता.