चित्रपटांचे सिक्वेल्स गाजवणार २०२४चा उत्तरार्ध!

By संजय घावरे | Published: May 18, 2024 07:55 PM2024-05-18T19:55:36+5:302024-05-18T19:55:45+5:30

पुढील सात महिन्यांमध्ये १२ सिक्वेल्स होणार प्रदर्शित

The sequels of the films will play in the second half of 2024 | चित्रपटांचे सिक्वेल्स गाजवणार २०२४चा उत्तरार्ध!

चित्रपटांचे सिक्वेल्स गाजवणार २०२४चा उत्तरार्ध!

मुंबई - यंदाच्या पहिल्या पाच महिन्यांमध्ये एकही चित्रपट ब्लॉकबस्टर ठरू शकलेला नाही. ऋतिक रोशन आणि दीपिका पदुकोणने चांगला व्यवसाय केला असला तरी ५०० कोटी रुपयांचा टप्पाही गाठू शकला नाही. या वर्षाच्या उत्तरार्धामध्ये गाजलेल्या चित्रपटांचे सिक्वेल्स येणार आहेत. या चित्रपटांकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

या वर्षातील पुढील सात महिन्यांमध्ये १२ चित्रपटांचे सिक्वेल्स येणार आहेत. यात एक मराठी आणि दोन इंग्रजी सिनेमांसोबतच इतर हिंदी-दाक्षिणात्य चित्रपटांचा समावेश आहे. कमल हासनच्या 'इंडियन'चा सिक्वेल ३१ वर्षांनी बनवण्यात आला आहे. जूनमध्ये रिलीज होणाऱ्या 'इंडियन २'मध्ये सिद्धार्थ, काजल अगरवाल, रकुल प्रीत सिंग अशी स्टारकास्ट आहे. १५ ऑगस्टचा मुहूर्त अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या 'पुष्पा २ - द रूल'ने बुक केला आहे. यातील अल्लू आणि रश्मिकांचा लूक लक्ष वेधणारा आहे. राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या 'स्त्री'चा सिक्वेल ऑगस्टमध्येच येणार आहे. अमर कौशिकच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी, अपारशक्ती खुरानासुद्धा आहेत. 'चट्टान २ - रिव्हाईव्ह' हा एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट सप्देंटबरमध्ये प्रदर्शित होईल. 

'भुल भुलैया २'च्या यशानंतर कार्तिक आर्यनचा 'भुल भुलैया ३' ऑक्टोबरमध्ये येईल. यात तृप्ती डिमरी, विद्या बालन, एलनाझ नौरोजी, नसीरुद्दीन शाह, माधुरी दीक्षित, बोमन ईराणी आहेत. रोहित शेट्टी टिमच्या 'सिंघम अगेन'मध्ये पुन्हा अजय देवगणने साकारलेल्या बाजीराव सिंघमचा जलवा पाहायला मिळेल. यात लेडी सिंघम दीपिका पदुकोणसह अक्षय कुमार आणि रणबीर सिंग, टायगर श्रॉफची जबरदस्त अॅक्शनही असेल. अर्जुन कपूरचा खलनायकी रंग दाखवणारा हा चित्रपट नोव्हेंबरमध्ये रिलीज होईल. अजयच्या 'रेड'चा सिक्वेल 'रेड २'च्या रूपात सिनेमागृहांमध्ये दाखल होणार आहे. डिसेंबरमध्ये 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटात अक्षय कुमार, श्रेयस तळपदेसह दिशा पाटणी, संजय दत्त, सुनील शेट्टी, लारा दत्ता, अरशद वारसी, जॅकलीन फर्नांडीस, रवीना टंडन, परेश रावल, तुषार कपूर, जॉनी लिव्हर यांची धमाल पाहायला मिळेल. आमिर खान आणि जिनिलीया देशमुखच्या 'सितारे जमीन पर' या चित्रपटाने या वर्षाचा शेवट होणार आहे. 
...........................
जूनमध्ये आदिल आणि बिलाल यांनी दिग्दर्शित केलेला विल स्मिथचा 'बॅड बॉईज ४' येणार आहे. नोव्हेंबरमध्ये टॉम हार्डी आणि जुनो टेम्पल यांचा 'वेनम - द लास्ट डिस्टन्स' हा 'वेनम'चा सिक्वेल येईल. 
..........................
संजय जाधव दिग्दर्शित 'ये रे ये रे पैसा ३' दिवाळीच्या मुहूर्तावर नोव्हेंबरमध्ये येणार आहे. यात संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, विशाखा सुभेदार, उमेश कामत, आनंद इंगळे, नागेश भोसले आहेत.
.....................
सचिन पिळगांवकरांच्या 'नवरा माझा नवसाचा २'चे चित्रीकरण या वर्षाच्या सुरुवातीला सुरू करण्यात आले, तर महेश कोठारेंनी 'झपाटलेला ३'ची घोषणा केली आहे. याचे चित्रीकरण या वर्षाअखेरीस सुरू होईल. 
......................
लोकसभा निवडणूकांमुळे पुढे गेलेल्या प्रसाद ओकच्या 'धर्मवीर २'ची प्रतीक्षा आहे. याखेरीज 'पुन्हा दुनियादारी', 'मस्का २', 'चोरीचा मामला २' या चित्रपटांची घोषणा करण्यात आली असून, काम सुरू आहे.
 
 

Web Title: The sequels of the films will play in the second half of 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई